

ठाणे : ठाणे जिल्ह्यात खतांच्या विक्रीसंबंधी पूर्वी ई पॉस यंत्रणा कार्यरत होती. त्यात डेटा व गती याबाबत अडचणी होत्या. या स्थितीत खत विक्रीची माहिती गतीने ऑनलाइन उपलब्ध व्हावी व यंत्रणा गतिमान असावी यासाठी ई पॉसमधील आधुनिक प्रणाली विकसित करून नवी एल-1 विक्री प्रणालीचे वितरण जिल्ह्यातील खत विक्रेत्यांना करण्यात आले आहे.
खत विक्रेत्यांकडून खत विक्री करताना आता जुनी यंत्रणा न वापरता नवी एल-1 विक्री यंत्रणा वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्रीय खत विभागाच्या सूचनेनुसार भारतीय आधार प्राधिकरणाने मानांकन दिलेली ही नवी यंत्रणा खत वितरणासाठी अत्यावश्यक आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आता सर्व खत विक्रेत्यांनी नवी एल-1 विक्री यंत्रणा घेऊन ती कार्यान्वित करणे बंधनकारक आहे. या जुन्या यंत्रणेद्वारे खत विक्री बंद होणार असून सर्व खते केवळ एल-1 विक्री यंत्रणेद्वारेच वितरित केली जाणार आहेत. ठाणे जिल्ह्यात एकूण 153 नवीन एल-1 यंत्रे कार्यान्वित करण्यात आली असून, यासाठी आरसीएफ कंपनी नेमण्यात आली आहे.
कंपनीकडून ही यंत्रे खत विक्रेत्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीतील कृषी अधिकारी किंवा जिल्हा परिषद, ठाणे येथील कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी केले आहे.
यंत्रणेच्या अंमलबजावणीस गती
मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या यंत्रणेच्या अंमलबजावणीस गती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे खत वितरण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता व शिस्तबद्धता येणार असून शेतकर्यांना वेळेवर खते मिळविणे सुलभ होईल. खत विक्रेत्यांनी नवी एल-1 यंत्रणा कार्यान्वित न केल्यास त्यांना दुकानातून खत विक्री करता येणार नाही, असा स्पष्ट इशारा कृषी विभागाने दिला आहे.