नेवाळी : श्रावण महिन्यात सण उत्सव यांसह नागरिकांकडून देवदर्शनाला सर्वाधिक पसंती दिली जाते. भाविक मोठ्या संख्येने देवदर्शनाला श्रावण महिन्यात जातात. कल्याणपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील तीर्थक्षेत्रांचे दर्शन देखील भाविकांना सहज होणार आहे. श्री मलंगगड भागातील खरड येथे असलेले शिव मंदिर, श्री मलंगगड, करवले येथील शनी मंदिर, कुंभार्ली येथील प्राचीन गायमुख तर पोसरी येथील इस्कॉन (राधा कृष्ण मंदिर) यांचे सहजच दर्शन श्रावण महिन्यात भाविकांना होणार आहे.
कल्याण जवळील श्री मलंगगडचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. त्यामुळे या भागात पर्यटकांकडून निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गर्दी केली जाते. परंतु या भागात असलेल्या प्राचीन तीर्थक्षेत्राची माहिती पर्यटकांना नसल्याने पर्यटक तीर्थक्षेत्रांकडे वळत नसल्याचे चित्र आहे. मात्र मलंगगड भागातील तीर्थक्षेत्र भाविकांना दर्शनासाठी सहजच उपलब्ध आहेत.
एका दिवसात सहज भाविकांनी श्री मलंगगड भागाची सफर केल्यास त्यांना पोसरी येथील इस्कॉन मंदिर, करवले शनी मंदिर, खरड शिव मंदिर यांचा सहजच दर्शन होणार आहे. तर श्री मलंगगडावर येत्या नारळी पौर्णिमेला मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जाणार आहेत. त्यामुळे श्री मलंगनाथांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना नारळी पौर्णिमेच्या सकाळची वाट पाहावी लागणार आहे.
श्री मलंगगड भागातील कुशीवली गावच्या डोंगरात रान देवी आहे. तर श्री मलंगगडाच्या पायथ्याशी वाघेश्वरी मंदिर, हनुमंत मंदिर तर वाडी गावात प्राचीन दत्त मंदिर देखील आहेत. श्री मलंगगड परिसरातील तीर्थक्षेत्रावर भाविकांना सहजच दर्शन उपलब्ध होणार आहेत. परंतु मंदिरांमध्ये जाताच परदेशी पेहराव चालत नसून भारतीय पोशाख अनिवार्य आहे. त्यामुळे कमी वेळात तीर्थक्षेत्रांवर जाण्यासाठी कल्याण जवळील श्री मलंगगड भागातील एक दिवसीय सहल नागरिकांसाठी सोयीची आहे.
श्री मलंगगड भागातील पर्यटनासाठी खासगी टॅक्सी नेवाळी नाका येथे उपलब्ध आहेत. पर्यटकांच्या संख्येनुसार आपला दर निश्चित करून श्री मलंगगड भाग टॅक्सीमधून स्थानिक चालक असल्याने फिरवतात. त्यामुळे भाविकांसाठी श्री मलंगगड भागाची कमी खर्चातील चांगली तीर्थयात्रा श्रावण महिन्यात सुखकर होत आहे.