

भाईंदर (ठाणे) : राजू काळे
मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील उत्तन परिसरात डेंग्यू सदृश आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे येथे वाढलेल्या डासांच्या प्रादुभावावरून दिसून आले आहे. मागील आठवड्यात या परिसरातील ७ हुन अधिक स्थानिकांचा डेंग्यू सदृश आजाराने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने येथील स्वच्छतेपासून वंचित राहिलेल्या नवीखाडी दुथडी भरून तिची घाण व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर आले. तर काहींच्या घरात शिरले. याचप्रमाणे उत्तनच्या धावगी डोंगर येथे पालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे. हा प्रकल्प डोंगरावर असल्याने त्यातील कचऱ्याचे सांडपाणी डोंगराखालील लोकवस्त्यांत तसेच पाण्याच्या स्त्रोतात व शेतीमध्ये वाहून येते. याखेरीज समुद्रातील कचरा मोठ्याप्रमाणात किनाऱ्यावर वाहून येत असतो. तर रस्त्याच्या साफसफाईतून गोळा केला जाणारा कचरा त्याचवेळी न उचलता तो रस्त्याच्या बाजूलाच जमा करून ठेवला जातो. यामुळे उत्तन परिसर अस्वच्छतेचे आगार बनले असताना येथील स्वच्छतेच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी पालिकेकडून ठोस कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून होऊ लागला आहे.
येथील नवीखाडीत तिवरांची झाडे असल्याचा कांगावा करीत तिच्या पावसाळ्यापूर्व साफसफाईला पर्यावरण विभागाच्या परवानगीचे ग्रहण लागले आहे. हे ग्रहण हटविण्यासाठी पालिकेकडून पर्यावण विभागाकडे ठोस पाठपुरावा केला जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. चारही बाजूने अस्वच्छतेने वेढलेल्या या परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. परिणामी परिसरात डेंग्यू सदृश आजाराचा प्रसार मोठ्याप्रमाणात वाढत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.
या डेंग्यू सदृश आजारामुळे मागील एका आठवड्यात परिसरातील ७ हून अधिक स्थानिकांचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले. त्यात लिंटन पाटील, मॅक्सीना गऱ्या, ग्लास्टन घोन्सलवीस, जेरोलीन नुनीस, जेस्सी बेचरी, रिगल परेरा, फ्रैंकी बेचरी आदींचा समावेश आहे. यावरून पालिकेच्या येथील आरोग्यव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून त्याला सर्वस्वी पालिकेचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. पालिकेने तात्काळ याची गंभीर दखल घेत हा परिसर डास मुक्त करून येथील परिसराची नियमित स्वच्छता करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
येथील नवीखाडीतील अतिक्रमणे तात्काळ हटवून खाडीचे पात्र रुंद करावे. तसेच खाडीची वेळोवेळी साफसफाई करून त्यातील पाण्याचा निचरा सुरुळीत करावा. याचप्रमाणे येथील घनकचरा प्रकल्पातील सांडपाणी लोकांच्या घरात, शेतीत तसेच पाण्याच्या स्रोतात शिरणार नाही, यासाठी पालिकेने ठोस उपाययोजना करावी.
प्रा. संदीप बुरकेन, समन्वयक धारावी बेत बचाव समिती
पालिकेने उत्तन परिसरात आरोग्य सर्वे तात्काळ सुरु करून स्थानिकांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी विशेष डॉक्टरांचे पथक नियुक्त करावे. याठिकाणी प्रभावी स्वच्छता मोहीम राबवून स्थानिकांची नियमित आरोग्य तपासणी करावी. तसेच आरोग्य विभागामार्फत नियमित औषध, धूम्र फवारणी मोहीम तातडीने राबवावी.
बर्नड डिमेलो, माजी नगरसेवक