डॉ. सचिन जायभाये
डेंग्यू हिमोर्हेजिक फीवर हा तीव्र स्वरूपाचा डेंग्यूचा प्रकार आहे. हा एकापेक्षा अधिक प्रकारच्या डेंग्यू विषाणूंच्या संसर्गामुळे उद्भवतो. तसेच याचा कालावधी जवळपास सात ते दहा दिवसांचा असतो. आजाराची अचानक सुरुवात, सात दिवसांपेक्षा अधिक दिवसांचा तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, पाठदुखी, स्नायुदुखी, सांधेदुखी, डोळ्यात आतील बाजूला तीव्र वेदना, चेहर्यावर लालसरपणा, भूक मंदावणे, उलटी, पोटात दुखणे ही लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येतात.
शरीराचे तापमान 40 डिग्री सें. ते 41 डिग्री सें. पर्यंत पोहोचते. अशावेळी लहान मुलांमध्ये आकडी येण्याची शक्यता असते. काही रुग्णांमध्ये गोवर सदृश्य पुरळ त्वचेवर उमटतो. बर्याचवेळा चेहर्यावर, हातापायांवर, छाती आणि काखेत रक्तस्त्राव झाल्याचे बारीक ठिपके (पेटिकेअल स्पॉटस्) दिसतात. रक्त घेण्यासाठी वगैरे शिरेमध्ये सुई टोचल्यानंतर टोचलेल्या जागी आणि सभोवतालच्या भागात लालसर आणि काळसर व्रण तयार होतो.
डेंग्यू हिमोर्हेजिक फीवर झाल्यास तीन ते आठ दिवसांच्या दरम्यान रक्तातील प्लेटलेट (बिंबिका) पेशींची संख्या कमी होऊन ती एक लाख किंवा त्यापेक्षा कमी होते. या अवस्थेला ‘थ्रोंबोसायटोपीनिया’ असे म्हणतात. नाकातून रक्तस्राव, हिरड्यातून रक्त झिरपणे, खोकल्यातून आणि उलटीतून रक्त पडणे, तसेच शौचावाटे रक्त पडणे अशी लक्षणे प्लेटलेट कमी झाल्यामुळे निर्माण होऊ शकतात. रुग्णामध्ये ‘हिमोकॉन्सन्ट्रेशन’ म्हणजेच रक्तातील ‘हिमॅटोक्रिट’ची पातळी 20 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक होत जाते. फुफ्फुसे व आतडे यांच्या आवरणांमधील पोकळीमध्ये प्लाझ्मा (रक्तरस) हा द्रव साचतो. याला अनुक्रमे प्ल्युरल ईफ्युजन व असायटिस असे म्हणतात.
काही रुग्णांमधे फुफ्फुसे व आतडे यांच्या आवरणांमधील पोकळीमध्ये प्लाझ्मा अधिक प्रमाणात झिरपल्यामुळे रक्तवाहिन्यांमधून वाहणारे रक्तद्रव्य कमी होते व परिणामत: रक्तदाब कमी होतो. याला ‘हायपोव्होल्युमिक शॉक’ असे म्हणतात. यातूनच पुढे ‘हायपोप्रोटिनेमिया’ ही अवस्था उद्भवते. ‘हायपोव्होल्युमिक शॉक’ मध्ये रक्तदाब धोकादायक पातळीच्या खाली जातो. प्लेटलेट पेशींची संख्या कमी होणे आणि हिमॅटोक्रिटची पातळी वाढणे यावरून या अवस्थेच्या तीव्रतेची कल्पना येते. डेंग्यूच्या या अवस्थेला ‘डेंग्यू शॉक सिंड्रोम’ असे म्हणतात.
डेंग्यू शॉक सिंड्रोममध्ये शरीरातील मुख्य अवयव जसे की किडनी, यकृत, फुफ्फुसे, हृदय निकामी होण्यास सुरुवात होते. याला मल्टिऑर्गन डिस्फंक्शन सिंड्रोम असे नाव आहे. डेंग्यू शॉक सिंड्रोम हा मुले आणि प्रौढ व्यक्तींमध्ये सारख्याच प्रमाणात आढळून येतो. उपचारांनी प्रयत्नांची शर्थ करूनही या आजारात मृत्यूचे प्रमाण जवळपास 44 टक्के असते.
डेंग्यूच्या विषाणूंनी रक्तात प्रवेश केल्यानंतर शरीर त्या विषाणूंवर प्रतिहल्ला करण्यासाठी काही अँटिबॉडीज तयार करते. रक्तातील अशा अँटिबॉडीज शोधणे हा डेंग्यूचे निदान करण्याचा सर्वात सोपा व सहजपणे उपलब्ध असलेला मार्ग आहे. एलायझा, हिमॅग्लुटिनेशन इनहिबिशन, न्युट्रलायझेशन, कॉम्प्लिमेंट फिक्सेशन अशा काही टेस्ट्स यासाठी उपलब्ध आहेत. डेंग्यूच्या विषाणूंनी रक्तात प्रवेश केल्यानंतर शरीराला या अँटिबॉडीज तयार करायला वेळ लागतो. हा काळ 5 ते 7 दिवसांचा असतो व तो मुख्यत्वे रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून असतो. याला विंडो पीरियेड असे म्हणतात.
या विंडो पीरियेडदरम्यान डेंग्यूची बाधा झालेली असली तरी शरीराने अँटिबॉडीज तयार केल्या नसल्याने टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते. याला फॉल्स निगेटिव्ह टेस्ट म्हणतात. त्यामुळे टेस्ट निगेटिव्ह असेल तर आजार नाही एवढा सरळसोट त्याचा अर्थ काढणे चुकीचे असते. ‘डेंग्यू एन एस 1 अँटिजन टेस्ट’ ही सहज उपलब्ध असलेली टेस्ट विंडो पीरियेडमध्ये आजाराच्या निदानासाठी मदतीची ठरते. व्हायरल कल्चर ही टेस्ट सर्वाधिक विश्वासार्ह मानली जाते. पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलोजी या संस्थेमध्ये याची सोय आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विषाणूजन्य आजाराची साथ निदर्शनास आल्यानंतर काही प्रातिनिधिक रुग्णांची रक्ततपासणी या संस्थेमार्फत करून साथीस कारणीभूत असलेल्या विषाणूंचे योग्य निदान केले जाते.
बेडरेस्ट घेणे, आराम करणे, दिवसातून 4 ते 5 लिटर पाणी पिणे, ताप आल्यास तापाचे औषध घेणे व थोड्या थोड्या अंतराने भरपूर वेळा जेवण करणे हे डेंग्यूच्या उपचारांचे मुख्य तत्त्व आहे. ताप खूप असल्यास रुग्णाच्या परिस्थितीवर संभाव्य दुष्परिणामांच्या अनुषंगाने देखरेख ठेवण्यासाठी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता भासते. डेंग्यूवर कुठलेही थेट औषध उपलब्ध नाही. डेंग्यूवरील उपचार हे मुख्यत: आधारभूत उपचार असतात. तापाची औषधे, सलाईनद्वारे देण्यात येणारे फ्लूईड्स व अन्य लक्षणांवर व दुष्परिणामांवर ते उद्भवतील तसेच उपचार करत जाणे हेच मुख्य तत्त्व उपचार पाळत असतात. डेंग्यूवर लवकर व योग्यवेळीचे उपाय पुढील गंभीर आजार टाळू शकतात.
डेंग्यूवरील तत्काळ उपचार एक प्रकारचा रोगप्रतिबंधक उपायच आहे. डेंग्यूवर अचूक औषधे उपलब्ध नसली तरी पुढील दुष्परिणाम टाळण्यासाठी रुग्णाला आधारभूत उपचारांची गरज असते. त्यामुळे डेंग्यूची लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. डेंग्यूवर नियंत्रण ठेण्यासाठी थायलंडने जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने चारही प्रकारच्या डेंग्यू विषाणूंविरोधी लाईव्ह अटेन्युयेटेड लस तयार केली आहे. या लसीच्या पहिल्या टप्प्याच्या चाचण्या सध्या सुरू असून भविष्यात ही लस उपलब्ध होऊ शकेल; मात्र सध्या डेंग्यूविरोधी लस उपलब्ध नाही.
उपचारांपेक्षा प्रतिबंध नक्कीच उत्तम त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनेकडे लक्ष केंद्रित करणे ही सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. डेंग्यू संसर्ग रोखण्यासाठी आजाराची माहिती शिक्षण कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हायला हवी. सर्वांनी डेंग्यूबद्दलची शास्त्रीय माहिती जाणून आपल्या राहणीमानात योग्य तो बदल करायला हवा. डेंग्यूची माहिती खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत पोहोचायला हवी. आपल्या परिसरात किटकनाशक फवारणी व डेंग्यू रोखण्यासाठी उपलब्ध असलेल्या इतर उपाययोजना अंमलात आणण्याबाबत सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. डास चावू नयेत म्हणून योग्य उपाययोजना सर्वांनी अंमलात आणायला हव्यात.
सर्वांनी परिसर स्वच्छ ठेवावा. डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी पाणी साठे नीट झाकून ठेवावेत. ठिकठिकाणी पाणी तुंबणार नाही यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी व सार्वजनिक व्यवस्थापन व्यवस्थांनी देखील नियमित योगदान देणे देखील आवश्यक असते.