

ठाणे : दिल्ली ते मुंबई या देशातील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील प्रमुख टप्प्यांचे काम आता अंतिम टप्प्यात असून, उर्वरित कामे गतीने पूर्ण करून २०२६ पर्यंत संपूर्ण महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट आहे. विविध राज्यांमधील अडथळे दूर करत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हा महामार्ग उभारला जात असून, दर्जेदार आणि सुरक्षित प्रवासावर भर देण्यात आला आहे.
या द्रुतगती मार्गातील दिल्ली परिसरातील एक महत्त्वाचा भाग जवळपास ९४ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाला आहे. उर्वरित किरकोळ कामे अंतिम टप्प्यात असून, हा मार्ग सुरू झाल्यानंतर राजधानी परिसरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. टप्प्याटप्प्याने सुरू होत असलेल्या या महामार्गामुळे दिल्लीपासून गुजरातपर्यंतचे अनेक भाग आधीच प्रवाशांसाठी खुले झाले आहेत, तर उर्वरित मार्गावर काम वेगात सुरू आहे.
सुमारे १,३५० किमी लांबीचा हा ८ लेनचा (भविष्यात १२ लेनपर्यंत विस्तारण्यायोग्य) महामार्ग दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांतून जाणार आहे. दौसा, कोटा, रतलाम, वडोदरा, सूरत यांसारखी महत्त्वाची शहरे या मार्गामुळे थेट जोडली जाणार आहेत. दिल्ली ते मुंबई हा प्रवास सध्याच्या सुमारे २४ तासांवरून थेट १२ तासांपर्यंत कमी होणार असल्याने दळणवळणाच्या दृष्टीने हा मोठा बदल ठरणार आहे.
हा महामार्ग सुरू झाल्यानंतर प्रवास केवळ जलदच नव्हे तर अधिक सुखकर आणि सुरक्षितही होणार आहे. नियंत्रित गुळगुळीत रस्ते, आधुनिक सेवा सुविधा, विश्रांती केंद्रे आणि हरित उपाययोजनांमुळे वाहनचालकांचा थकवा कमी होईल. वेळ, इंधन आणि प्रवेश निर्गम, खर्चाची बचत होत प्रवाशांना तणावमुक्त प्रवासाचा अनुभव मिळेल, तर व्यापार, उद्योग आणि पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.
असा असेल द्रुतगती महामार्ग
लांबी: अंदाजे १,३५० किमी
लेनः ८ (१२ लेनपर्यंत विस्तारण्यायोग्य)
राज्येः दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र
प्रवासाचा वेळः २४ तासांवरून १२ तासांपर्यंत कमी
पूर्णत्वाची अपेक्षा : २०२६
प्रवाशांसाठी मिळणारे फायदे
जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास
इंधन व वेळेची मोठी बचत
आधुनिक विश्रांती केंद्रे व सेवा सुविधा
वाहतुकीची कोंडी कमी, तणावमुक्त ड्रायव्हिंग
व्यापार, पर्यटन व स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना