

डोंबिवली : दिवाळी सणाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज आणि निमित्त राजगड किल्ला थीमवर १० x १५ फूट अशी भव्य रांगोळी डोंबिवलीतील ट्रेक क्षितिज संस्थेने साकारली आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही श्री गणेश मंदिर संस्थानच्या आवारात साकारलेली ही रांगोळी पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली आहे.
ट्रेक क्षितिज संस्था दरवर्षी गणपती मंदिराच्या प्रांगणात किल्ल्यांची प्रतिकृती रांगोळीच्या माध्यमातून साकारत असते. शिवरायांचे आठवावे रूप…शिवरायांचा आठवावा प्रताप...छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राला लाभलेले आराध्यदैवत आहे. ज्यांच्या पराक्रमाची गाथा पिढ्यांपिढ्या अनेकांना प्रेरित करत आहे. पराक्रमाचे स्फुल्लिंग जागवण्यासाठी छत्रपती शिवरायांसह किल्ल्यांची प्रतिकृती रांगोळीच्या माध्यमातून ट्रेक क्षितिज संस्था साकारत असते. यावेळी संस्थेने नाविन्यपूर्ण विशेष भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. १० x १५ फूट एवढ्या मोठ्या आकाराची ही रांगोळी प्रेक्षकांसाठी अनोखा अनुभव ठरली आहे. यंदाची रांगोळी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा पराक्रमी राजगड किल्ला या विषयावर आधारित आहे. महाराजांच्या इतिहासाच्या गौरवशाली क्षणांना आणि त्यांच्या शौर्याला उजाळा देण्यासाठी ही रांगोळी साकारण्यात आली आहे.
कुशल देवळेकर यांच्या संकल्पनेतून आर्टीस्ट विरेश वाणी यांनी जिनल राठोड यांच्या मदतीने महेंद्र गोवेकर, महेश मुठे, गायत्री धर्माधिकारी, स्वप्ना लिमये, सोनाली खापरे, तुषार धुरी, श्रीरंग वैद्य, गौरव परब या कलाकारांनी ही रांगोळी साकारली आहे. ही रांगोळी साकारण्यासाठी २ दिवस लागले असून साधारणतः १० किलो रांगोळी आणि तेवढ्याच रंगाचा वापर करण्यात आला आहे.
सर्व कलाप्रेमी, इतिहासप्रेमी आणि डोंबिवलीकरांनी या अद्वितीय रांगोळीचे दर्शन घ्यायला आवर्जून आमंत्रित करण्यात येत आहे. दिवाळीच्या निमित्ताने या देखण्या कलाकृतीचा आनंद घ्यावा आणि आपल्या संस्कृतीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन ट्रेक क्षितिज संस्थेने केले आहे. सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत गुरूवार ते रविवारपर्यंत रांगोळी पाहता येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.