

मिरा रोड / ठाणे : एकेकाळी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा हस्तक मानला जाणारा सुभाषसिंह ठाकूर याला आज, मंगळवारी ठाणे न्यायालयात हत्येच्या प्रकरणात हजर करण्यात आले. वसई-विरार-मिरा-भाईंदर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने उत्तरप्रदेशातील फतेहगड मध्यवर्धी कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर त्याची कोठडी पोलिसांना मिळाली आहे. त्याच्या कोठडीमुळे अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईतील जे.जे. हत्याकांड प्रकरणी सुभाषसिंह याला अटक झाल्यानंतर तो उत्तरप्रदेशातील कारागृहात शिक्षा भोगत होता.त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता त्याला 22 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
भारत देशासह नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, दुबई आणि इतर देशांत गुन्हेगारी कारवायासाठी नेटवर्क असलेला कुख्यात आंतरराष्ट्रीय गँगस्टर सुभाषसिंह शोभनाथ ठाकूर याचा ताबा मिरा भाईंदर-वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा 1 ने घेतला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार उत्तर प्रदेशातील फतेहगढ जेलमधून ठाकूरचा ताबा घेतला. उत्तरप्रदेश पोलिसांच्या कडक बंदोबस्तात त्याला लखनऊ विमानतळावर आणून तेथून मुंबई विमानतळावर आणण्यात आले.
मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्याला मिरा भाईंदर परिसरात आणण्यात आले आहे. त्यानंतर त्याची भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याला ठाणे येथील मकोका न्यायालयात हजर केले असता 22 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी यापूर्वीही ठाकूरचा ताबा घेण्यासाठी एक पथक पाठवले होते, मात्र त्यावेळी प्रकृती अस्वस्थ्यामुळे ताबा मिळू शकला नव्हता. मात्र, विद्यमान पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
विरार पोलीस ठाण्यात 2022 मध्ये दाखल असलेल्या या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक समय चौहान यांची गोळी मारुन हत्या करण्यात आली होती. या हत्येचा कट रचण्यात आणि सक्रिय सहभागाबद्दल आतापर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुभाषसिंह ठाकूर हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याने, त्याला या गुन्ह्यात 14 वा आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून 2015 मधील बंटी प्रधान खून प्रकरणातही त्याचा सहभाग होता का, याबाबतचा तपासही केला जाणार आहे. हा ताबा घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखा-1 चे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत आणि सहाय्यक फौजदार मनोहर तावरे हे गेले होते. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, गुन्हे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ हे करत आहेत.
विशेष सरकारी वकिलांचा युक्तिवाद
आपल्या युक्तिवादात विशेष सरकारी वकील संजय मोरे म्हणाले आरोपी सुभाष सिंग ठाकूर यांच्या विरोधात विरार पोलीस ठाण्यात विकासक व बिल्डर समय चव्हाण यांची हत्या घडवून आणल्याचा आरोप असल्याने या गुन्ह्यात तू आणि मोक्कांतर्गत कारवाई करीत गुन्हा दाखल केला होता. हत्येच्या या गुन्ह्यात आरोपीने गुन्हा करताना जे काय मोबाईल फोन वापरले, ज्या हत्यारांचा वापर केला. ते मोबाईल आणि हत्यारे गायब करण्यात आली. याच प्रकरणांशी संबंधित असलेला आरोपी जो 13 व्या क्रमांकाचा आरोपी आहे. मुख्य आरोपीच्या सांगण्यावरून सदर पुरावे नष्ट केल्याची माहिती पोलिसांना असून त्याचा शोध घ्यायचा आहे. त्याकरिता आम्ही पोलीस कस्टडीची मागणी केली.