

मिरा रोड: गेल्या अनेक दिवसांपासून मिरा-भाईंदरकर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या दहिसर ते काशिगाव मेट्रोचा लोकार्पण सोहळा अखेर 6 एप्रिल रोजी पार पडणार आहे. मात्र, या प्रकल्पाचे श्रेय लाटण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये मोठी चढाओढ सुरू असताना, दुसरीकडे प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
दहिसर ते काशीगाव मेट्रो लोकार्पण सोहळा सुरुवातीला 3 एप्रिल रोजी होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर राजकीय पुढाऱ्याकडून बॅनरबाजीला उधाण आले. भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्या समर्थकांकडून शहरात ठिकठिकाणी मोठमोठे फलक लावून मेट्रोचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. नेत्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आता 6 एप्रिल हा नवा मुहूर्त ठरला असला तरी, प्रशासकीय पातळीवर मात्र अजूनही धावपळ सुरू आहे.
लोकार्पणाची तारीख जवळ आली असली तरी काशिगाव, मिरागाव आणि पेणकरपाडा स्थानकांवर प्रवाशांच्या मूलभूत सुविधांची वानवा आहे. सर्वात गंभीर प्रश्न पार्किंगचा आहे. मिरा रोड, भाईंदर पश्चिम, उत्तन, नवघर किंवा पेणकरपाडा येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी स्थानक परिसरात वाहन उभे करण्यासाठी कोणतीही अधिकृत जागा उपलब्ध नाही.
रिक्षा स्टँड किंवा खासगी वाहनांसाठी योग्य नियोजन नसल्याने स्थानकाबाहेर आत्तापासूनच अवैध पार्किंग सुरू झाली आहे. मेट्रो सुरू झाल्यावर प्रवाशांची मोठी गर्दी होणार आहे, अशा वेळी प्रवाशांना स्थानकावरून घरी जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. स्टेशन परिसरातील अर्धवट कामे आणि वाहतुकीचे ढिसाळ नियोजन यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात मग्न
मेट्रो सुरू होणे ही आनंदाची बाब आहे, पण केवळ श्रेय घेण्यासाठी घाईघाईत लोकार्पण उरकले जात आहे का? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत. नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आणि फलक लावण्यात मग्न आहेत. पण स्टेशनवर उतरल्यावर प्रवाशांनी जायचे कसे आणि गाड्या लावायच्या कुठे, याचे उत्तर कोणाकडेही नाही.
प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष द्यावे अशी प्रवाशांकडून मागणी केली जात आहे. स्थानक परिसरातील सुशोभीकरण आणि पोहोच रस्ते अद्याप अपूर्ण आहेत. बस सेवा किंवा रिक्षा नियोजनाचा अभाव दिसत आहे. श्रेयवादाच्या लढाईत सुरक्षा नियमांकडे काणाडोळा केला जात असल्याचे दिसून येत आहे. मेट्रो धावणार हे निश्चित असले तरी, प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार की कष्टदायक , हे येणारा काळच ठरवेल.