

डोंबिवली : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे नातू गिटार वादक आणि ऍक्युपंक्चर थेरपिस्ट किरण फाळके यांचे शनिवारी पहाटे 5 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी ते 78 वर्षांचे होते. डोंबिवलीतील शिवमंदिर मोक्षधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गेल्या 60 वर्षांपासून किरण फाळके यांचे डोंबिवलीत वास्तव्य होते. या 6 दशकांमध्ये डोंबिवलीत घडलेली स्थित्यंतरे त्यांनी जवळून पाहिली आणि अनुभवली होती. अनेक वर्षे शास्त्रज्ञ म्हणून काम करणारे किरण फाळके हे अत्यंत स्वच्छंदी आणि हसतमुख स्वभावाचे होते. ॲक्युपंक्चर शास्त्राचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. 35 वर्षांपासून ते गरजूं वर मोफत उपचार करत होते. नुकतीच त्यांची भिवंडीतील एका महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले.
गिटार वाजवत गाणी म्हणून लोकांचे मनोरंजन करणे हा त्यांचा छंद होता. वाद्य वाजविण्यात त्यांचे नैपुण्य होते. की बोर्ड, साऊथ अर्बन, गिटार, हवाईयन गिटार यांसारख्या 5 ते 6 वाद्य वाजविण्यात त्यांचा हातखंडा होता. अलीकडे डिजिटल ऑडियो रेकॉर्डिंगच्या माध्यमातून त्यांनी दोन ध्वनिमुद्रिका तयार केल्या. इतकेच नव्हे तर स्वतःच्या दुचाकीवरून त्यांनी डोंबिवली ते कन्याकुमारी आणि पाकिस्तान सरहद्दपर्यंत भारत भ्रमण केले. त्यांच्या निधनाने डोंबिवलीतील एक अष्टपैलू व्यक्तीमत्व हरपल्याची भावना व्यक्त करत भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी किरण फाळके यांना श्रद्धांजली अर्पण केली.