फासावर लटकण्याआधीच क्रुरकर्मा स्वतःच फासावर चढला

विशाल गवळीच्या मृत्यूमुळे पिडीत कुटुंबीयांत समाधान
दिवंगत बालिकेच्या वडिलांनी आपल्या लेकीच्या तसबिरीसमोर दिवा लावून प्रार्थना केली.
दिवंगत बालिकेच्या वडिलांनी आपल्या लेकीच्या तसबिरीसमोर दिवा लावून प्रार्थना केली.Pudhari Photo
Published on
Updated on

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

उमलत्‍या कळीला कुस्करून तिला कायमची नष्ट करणारा क्रूरकर्मा विशाल गवळी याने तळोजा मध्यवर्ती कारागृहात टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेचे वृत्त कल्याणात येऊन धडकताच पिडीत बालिका राहत असलेल्या परिसरातील रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. पिडीत कुटुंबाने समाधान व्यक्त केले आहे. दिवंगत बालिकेच्या वडिलांनी आपल्या लेकीच्या तसबिरीसमोर दिवा लावून प्रार्थना केली.

प्रसार माध्यमांशी बोलताना बालिकेच्या वडिलांनी सांगितले की, क्रूरकर्मा विशाल गवळी याने जे कृत्य आमच्या मुलीसोबत केले, ते क्षमस्व नाही. त्याला फाशीच्या शिक्षेसाठी आम्ही कोर्टात लढा देत होतो. पण देवानेच त्याला शिक्षा दिली आहे. याठिकाणी जशाच तसा न्याय झाला आहे. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी वेळोवेळी सहकार्य आणि पाठिंबा दिला आहे.

यावेळी पीडित मुलीच्या वडिलांनी विशाल गवळीच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. गवळीचे दोन्ही भाऊ तडीपार आहेत. ते कायम परिसरात दहशत निर्माण करतात. त्यांच्याकडे हत्यारे सुद्धा आहेत. फक्त त्याचे भाऊ नाही तर, त्याचे वडीलही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. आमच्या परिवारावर हल्ला होण्याची शक्यता आहे, अशी भीती पिडीत बालिकेच्या वडिलांनी बोलून दाखवली.

फाशीची शिक्षाच होणार होती - आ. सुलभा गायकवाड

या घटनेवर स्थानिक आमदार सुलभा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, या घटनेनंतर कल्याणमधील लोकांनी जागोजागी होर्डिंग लावून आरोपीला फाशी द्या, अशी मागणी केली होती. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जनसामान्यांकडून होत होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला सांगितले होते की, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल. जास्तीत जास्त तीन ते चार महिन्यांत आरोपीला फाशी होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे हा खटला ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपविण्यात आला होता. दोन ते तीन महिन्यांत या प्रकरणी निकाल लागून आरोपीला शिक्षा होणार होती. त्याआधीच त्याने आत्महत्या केली.

...तर अशा घटनांना आळा बसण्यास मदत

आमदार सुलभा गायकवाड म्हणाल्या, आरोपीने स्वतःहून फाशी लावून घेतली हे चांगलेच झाले. परंतु न्यायालयाने याप्रकरणी त्याला शिक्षा सुनावली असती आणि नंतर त्याला फाशी झाली असती तर बरं झालं असतं. परंतु पिडीत कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना आमच्या मनात आहे. हल्ली अनेक ठिकाणी असे गुन्हे घडत आहेत. त्यामुळे विशाल गवळीसारख्या आरोपीला न्यायालयाकडून फाशीची शिक्षा झाली असती तर अशा प्रकारच्या घटनांना आळा बसण्यास मदत झाली असती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news