डोंबिवली : रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन घटनांमध्ये दोघा रिक्षावाल्यांवर पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका घटनेत मद्यपान केलेल्या एका रिक्षावाल्याने पोलिस हवालदाराला पाठीमागून जोरात धडक देऊन त्याला जखमी केले. तर दुसऱ्या प्रकरणात एक रिक्षावाला डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ वाहतूक कार्यालयासमोर रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा उभी करून वाहतुकीला अडथळा आणत होता. या दोन्ही दारूड्यांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.
रामनगर पोलिस ठाण्याचे हवालदार रवी व्हनवटे सोमवारी आपल्या सहकाऱ्यांसह गस्त घालत होते. इतक्यात रेल्वे स्थानकाजवळील वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयासमोर आल्यावर त्यांना एक रिक्षावाला रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा उभी करून इतर वाहनांना अडथळा होईल आणि इतर वाहन चालकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत थांबला होता. त्याचे नाव दिलीप गोरबंजारा (32, रा. द्वारलीपाडा, कल्याण-पूर्व) असे असून त्याला हवालदार व्हनवटे यांनी समज दिली. पोलिस ठाण्यात नेऊन त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशी कृती केली म्हणून गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या एका प्रकरणात, रामनगर पोलिस ठाण्यातील हवालदार दिलीप पवार आणि त्यांचे सहकारी रविवारी रात्रीच्या वेळेत ठाकुर्लीतील 90 फुटी रस्त्यावरील म्हसोबा चौकात नाकाबंदीसाठी गस्तीवर होते. संशयित वाहनांची पोलिसांचे पथक तपासणी करत होते. इतक्यात 90 फुटी रोडने कल्याण दिशेकडून एक भरधाव वेगात रिक्षावाला आला. त्याला हवालदार पवार आणि सहकाऱ्यांनी थांबण्याचा दूरवरून इशारा केला. पण रिक्षाचालकाने न थांबता समोर तपासणीसाठी उभ्या असलेल्या वाहनाला धडक दिली. या धडकेत हवालदार मोरे वाहन आणि रिक्षा यांच्यात जोराने दाबले गेले. यावेळी रिक्षावाला सोहेल खान (वय 31) हा दारूच्या नशेत झिंगलेला होता. सोहेल हा म्हसोबा चौक परिसरात कुटुंबीयांसह राहतो. पोलिसांनी ताब्यात घेताच सोहेलचे वडील समेशर, आई शबनम आणि इतर तीन जणांनी पोलिसांनांच धमकावण्यास सुरूवात केली. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या संदर्भात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून हवालदार दिलीप पवार यांच्या तक्रारीवरून सहा जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.