

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडील मुरबाड रोडला असलेल्या गणेशघाट भागात वर्दळीच्या रस्त्यावर एक विक्रेता शोभेच्या वस्तू, माती आणि प्लास्टिकच्या कुंड्या वाहतुकीस अडथळा होईल अशा पध्दतीने विक्री करत होता. सार्वजनिक वाहतुकीत अडथळा आणि जीवितास धोका निर्माण होईल अशी कृती केल्याने महात्मा फुले चौक पोलिसांनी या विक्रेत्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
मोहम्मद हजरत मोहम्मद अमिन शेख (52) असे विक्रेत्याचे नाव असून तो मुरबाड रोडला असलेल्या गणेशघाट भागात राहतो. मंगळवारी दुपारच्या सुमारास महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे हवालदार वामन बरमाडे हे त्यांच्या सहकाऱ्यासह दुचाकीवरून गस्त घालत होते. गणेश घाट बस आगारा समोर असलेल्या वर्दळीच्या रस्त्यावर मोहम्मद शेख रस्त्याला अडथळा होईल अशा पध्दतीने प्लास्टिक, मडकी, मातीच्या कुंड्या आणि भांडी विक्री करण्यासाठी बसला होता. त्याला पंचांसमक्ष पोलिस ठाण्यात आणले व त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण परिमंडळाचा पदभार स्वीकारल्यापासून कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर ठेले, हातगाड्या लावून रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करणारे, सार्वजनिक ठिकाणी गॅसचे सिलिंडर लावून खाद्यपदार्थ विक्री करणारे, तसेच सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांनी जोरदार मोहीम उघडल्याने कल्याण-डोंबिवलीकरांनी समाधान व्यक्त केले आहे.