Counseling Center in Thane | समुपदेशन केंद्र पीडितांचे 'आधारघर'
ठाणे : कौटुंबिक हिंसा, छळ, मारहाण आदी प्रकारांनी त्रासलेल्या महिलांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागांतर्गत सुरु करण्यात आलेली समुपदेशन केंद्रे महिलांसाठी आधार घर ठरत आहेत. या केंद्रांमध्ये समुपदेशनासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक नेमले गेले असून, पंडित महिलांना तणावातून मुक्त करण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यात मदत करण्यासाठी पिडीत या केंद्रांचा आधार घेत आहेत.
महिला व बालविकास विभागामार्फत 2024-2025 या आर्थिक वर्षात महिलांसाठी विशेष योजना अंतर्गत महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालवण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात पाच समुपदेशन केंद्र सुरू असून प्रत्येक केंद्रासाठी संस्थेमार्फत समुपदेशक, विधीसल्लागार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पीडित महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक नेमले आहेत. नियुक्त कर्मचारी, अधिकारी पीडित महिलांची समस्या जाणून घेतात. महिलेस असलेली समस्या काय? त्यावर कायदेशीर मार्ग कोणते आहेत? याबाबत सल्ला दिला जातो. एकंदरीत सल्ला घेण्यासाठी आलेल्या या महिलांना सामाजिक, मानसशास्त्रीय, कायदेशीर समुपदेशन या केंद्रात केले जाते. महिलांचे समुपदेशन करण्यासाठी कार्यालयीन वेळेत कामकाज सुरू असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी दिली.
समुपदेशन केंद्राचे नाव व पत्ता
कौंटुबिक समुपदेशन केंद्र - सा.बां वि दुसरा मजला, ठाणे
कौंटुबिक समुपदेशन केंद्र - पंचायत समिती, कल्याण
महिला विकास समुपदेशन केंद्र - पंचायत समिती शहापुर
आश्रय महिला संस्था - तहसिल कार्यालय, अंबरनाथ
चेतना महिला समुपदेशन केंद्र - ता. मुरबाड जि. ठाणे

