

डोंबिवली : राज्यातील बहुचर्चित पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यास महायुती सरकारला शनिवारचा मुहूर्त लाभला. मात्र पालकमंत्र्यांच्या यादीवरून राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. काही जिल्ह्यांत महायुतीमधील मतभेद समोर आले आहेत. दरम्यान यावर मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी भन्नाट प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील नेत्यांना नाव न घेता टोमणा मारत अनेक गौपस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे. तसे ट्विटद्वारे पाटील यांनी लक्षही वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
महायुतीच्या सरकारमधील पालकमंत्रीपदांचे वाटप करण्यात आले. यामध्ये अनेक मंत्र्यांना या पदापासून वगळण्यात आले आहे. यावरून मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर उफाळून आला आहे. पालकमंत्रीपदावरून रायगडमध्ये मोठा राडा देखील झाला. या साऱ्या गोंधळानंतर महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचाली पहायला मिळाल्या. यावरच मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील प्रतिक्रिया देताना म्हणाले की, पालकमंत्री पद कुठले पाहिजे ? गडचिरोली ? पालघर, रायगड ? कारण रायगडला पोर्ट आहे. वाढवण बंदर पालघरला येते. तर गडचिरोत खदानी आहेत. हे कशासाठी पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून काय सेवा करायची की मेवा खायचा ? हे आमच्यासारख्या राजकारणाला माहित आहे. जनतेला ते माहित नाही. पण डीपीडीसीमध्ये आम्ही पाहतो की केलेल्या मागण्या काही पूर्ण होत नाहीत. त्यामुळे ठीक आहे, जे काय चाललेय त्यांना लखलाभ, असा टोमणा राजू पाटील यांनी मारला.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यावरून मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील प्रतिक्रिया देत सांगितले की, आमची सर्वांची अपेक्षा होती की गणेश नाईक यांना पालकमंत्री पद मिळावे. ते असते तर आगरी समाजालाही न्याय मिळाला असता ही अपेक्षा इथल्या जनतेची होती. या अनुषंगाने मी बोललो की पालकमंत्री पद आगरी समाजाला ठेंगा दाखवून गेले. शेवटी मुख्यमंत्री असताना या भागाचे काही झाले नाही, तर पालकमंत्री झाल्यावर काय होणार आहे ? असा सवाल राजू पाटील यांनी उपस्थित केला. आमच्या ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण झाल्या नाहीत. उदाहरणार्थ धरणाची फक्त घोषणा झाली. मुख्यमंत्री असताना लँड एक्वेजीशन पॉलिसी जाहीर व्हायला पाहिजे होती ती झाली नाही, असाही गौप्यस्फोट ट्विटद्वारे करून राजू पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.