

डोंबिवली : डोंबिवलीकर युवकांमध्ये प्रचंड चैतन्य, उत्साह आणि निखळ प्रेम, आपुलकी भावते. दरवर्षी इथे दिवाळी पहाटनिमित्त येताना नवव्या कलासंगती पहायला मिळतात, युवा वर्ग स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रचंड झटत असतो. वेगळेपण निर्माण करणे आणि ते जगासमोर आत्मविश्वासाने मांडून सिद्ध करून दाखविणे हीच या शहराची ओळख आहे. असेच अनोखे काही तरी करण्यासाठी डोंबिवलीकर तरूणाईला आणि समस्त नागरिकांना डोंबिवलीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
डोंबिवलीचा नाका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फडके रोडवर दिवाळी निमित्त गुरूवारी तरूणाई मोठ्या संख्येने उसळली होती. मंत्री चव्हाण यांनी तरूणांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. अप्पा दातार चौकात उभारलेल्या व्यासपीठावर जाताच मंत्री चव्हाण यांना रवी दादा आगे बढो...जय श्रीराम...भारत माताकी जय...च्या घोषणा दिल्या. व्यासपीठावरून उपस्थितांना मंत्री चव्हाण यांनी संबोधित केले. आपल्या शहराचे नाव जगभर पसरवून देशाच्या जडणघडणीत प्रत्येक डोंबिवलीकरांचे योगदान आहे. आकर्षक कपडे, रंगसंगती असलेल्या वेशभूषा पाहून नागरीक एकत्र येतात, गुण्यागोविंदाने नांदतात हे पाहून आनंद वाटल्याचे मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले. अशीच दिवाळी 23 नोव्हेंबरला करण्यासाठी हा जोश टिकवून ठेवावा, असेही आवाहन त्यांनी केले.