

डोंबिवली : दिवाळीचा सण आनंदाने साजरा करण्याऐवजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शेकडो कंत्राटी कामगार आज बोनसच्या मागणीसाठी मुख्यालया समोरील रस्त्यावर उतरले. हातात मागण्यांचे फलक घेत, त्यांनी केडीएमसी मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडत प्रशासनाकडून न्याय मिळवण्याची मागणी केली.
गेल्या दोन महिन्यांपासून श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून बोनससाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. कामगारांनी अनेक निवेदने दिली, बैठकाही घेतल्या, मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे संतप्त कामगारांनी अखेर लक्ष्मीपूजन दिवाळीच्या दिवशीच आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आंदोलनकर्त्या कामगारांचे म्हणणे आहे की, आम्ही कंत्राटी पद्धतीने काम करत असलो तरी महानगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजात आमचा महत्त्वाचा वाटा आहे.
कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दरवर्षी बोनस दिला जातो, मग आम्हाला का नाही ? आमचीही घरे, कुटुंबे आहेत. दिवाळीच्या आधी बोनस मिळावा ही न्याय्य मागणी आहे. या ठिय्या आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर तात्काळ बोनसबाबतचा निर्णय घेण्यात आला नाही, तर पुढील काही दिवसांत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.