Kalyan | कल्याणात संविधान अमृत महोत्सव संपन्न

Constitution Amrit Mahotsav concluded in Kalyan
कल्याणात संविधान अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
Published on
Updated on

डोंबिवली : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे ॲडव्होकेट गजानन चव्हाण यांच्या प्रयत्नातून कल्याण येथे दिवाणी वकील संघटना, कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटना, उल्हासनगर वकील संघटना, मुरबाड वकील संघटना आणि शहापूर वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश जगताप यांच्या पुढाकाराने शनिवारी कल्याणातील के. सी. गांधी हायस्कूलच्या सभागृहात संविधान अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी सर्वप्रथम संविधानाचा सरनामा आणि संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला गुलाब पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. या समारंभा बाबत मातृसंस्था वकील परिषदेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुदीप पासबोला यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. यानंतर उपस्थित महोदयांना गुलाब पुष्प आणि पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

मातृसंस्था वकील परिषदेचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट जयंत जायभावे यांनी संविधानाच्या सर्वनामाचे वाचन केले. त्यांच्या मागे उपस्थित सर्वांनी संविधानाचे सरनामाचे एकत्रितरित्या वाचन केले. जायभाये यांनी संविधान निर्मिती बाबत विविध दाखल्यांचा आधार घेत संविधान कसे निर्माण झाले याबाबतचे ओजस्वी भाषेत विवेचन केले.

ज्यांच्या हातून आत्तापर्यंत साडेसातशेहून अधिक न्यायाधीश महाराष्ट्रातील न्यायव्यवस्थेमध्ये दिले आहेत त्या ॲडव्होकेट गणेश शिरसाट यांनी संविधानाबद्दल माहिती देताना संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घटना निर्मितीमध्ये महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगून ऐतिहासिक असे केशवानंद भारती विरूद्ध केरळ सरकार या खटल्याचा रोमहर्षक उलगडा केला. केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार हा खटला सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पिठासमोर संविधानाच्या 13 न्यायाधीशांसमोर कसा चालला ? तसेच या खटल्यातील दोन्ही पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद कसा कसा होत गेला ? दोन्ही पक्षांच्या वकिलांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचे कसे प्रयत्न केले ? तसेच घटना पिठातील 13 न्यायाधीशांमधील काही न्यायाधीशांचा एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न कसा झाला ? या साऱ्याचा उलगडा ॲडव्होकेट गणेश शिरसाट यांनी त्यांच्या दीड तासाच्या मार्गदर्शनपर विवेचनात अतिशय सुंदर पद्धतीने गुंफला.

ॲडव्होकेट गणेश शिरसाट यांचे व्याख्यान म्हणजे केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकारचा खटला ऐकणारे जणू प्रत्यक्ष अनुभवत होते. डोळ्यासमोर प्रसंग चित्र उभे राहत होते. वरिष्ठ ॲडव्होकेट नानी पालखीवाला यांच्या जुनिअर वकिलांचा सहभाग ही किती महत्वपूर्ण होता हेही सांगितले. ज्युनिअर वकील केसमधील उतारे दाखले हॉटेलमध्येच विसरले याचे जाणीव होताच ज्युनिअर वकिलांनी प्रसंगावधान राखत कशा पद्धतीने ते दाखले उतारे हॉटेलमधून सर्वोच्च न्यायालयात आणले हा प्रसंग तर अंगावर शहारे आणणार होता.

ॲडव्होकेट गणेश शिरसाट यांच्या मार्गदर्शन व्याख्यानाचे सार म्हणजे संसद मोठी की सर्वोच्च न्यायालय मोठे की भारतीय संविधान मोठे ? याचा उलगडा झाला. यात भारतीय संविधान सर्वात मोठे असल्याचे त्यांनी केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार या खटल्याच्या माध्यमातून सिद्ध केले. हे सांगत असतानाच राजकारणी लोक म्हणजेच संसदेतील खासदार, मंत्री, प्रधानमंत्री, आदी आपल्या स्वार्थासाठी संविधानाच्या स्ट्रक्चरमध्ये कधीही बदल करू शकणार नाहीत. तसे त्यांना करताही येणार नाही ॲडव्होकेट गणेश शिरसाट यांनी ठासून सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news