

ठाणे : ठाणे जिल्हा विकासाचे खणखणीत नाणे आहे. मुंबई-ठाण्याचा प्रवासही आता सुसाट होईल. ठाणे जिल्ह्याचे विकासाचे योगदान ४८ मिलियन डॉलर आहे, २०३० पर्यंत हे योगदान १५० मिलियन डॉलर पर्यंत केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, त्याप्रमाणे महाराष्ट्र पॉवर स्टेशन आहे, स्वातंत्र्यानंतर मुंबईचा मोठा विकास होतो आहे. याच मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न पूर्ण होईल, हीच मुंबई जागतिक व्यापाराचे केंद्र होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधाना समक्ष दिली. आम्ही डोंगराएवढी कामे करत असल्याने विरोधक रोज आम्हांला शिव्या शाप देतात, आम्ही मात्र त्यांना कामातूनच उत्तर देवू, असे त्यांनी विरोधकांनाही सुनावले.
नवरात्रीत लाडक्या बहिणींना मोठ्या भावाला पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली आहे. एकाच वेळी महाराष्ट्रात खूप चांगले योग जुळून आले आहेत, ठाणेकरांना हा दिवस सुवर्णक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे, असे सांगून शिंदे पुढे म्हणाले, विकास पुरूष, विश्वगुरू देशाचे पंतप्रधान मोदींना आरामात, चिंतेत मी कधी पाहिले नाही, ते सतत देशाचा विकासाला गती देण्यासाठी प्रयत्नशील असतात. विकासकामांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले, तर तो प्रकल्प पूर्ण होण्याची हमी असते, कारण ते प्रकल्प पूर्णत्वाला नेण्याचा आणि त्याचे लोकार्पण करण्याचा मान आणि योग मोदी यांनाच मिळतो, हे चित्र फार कमी वेळा पाहयला मिळते, असे त्यांनी नमूद केले.