Ekanath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला वादळाचा तडाखा!

कल्याण परिसरात अचानक बदलले हवामान : पायलटच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अनर्थ
Ekanath Shinde
Ekanath Shinde
Published on
Updated on

ठाणे : एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर गुरुवारी दुपारी खराब हवामानामुळे वादळी वाऱ्यांच्या तडाख्यात सापडल्याने काही काळ मोठी खळबळ उडाली. मात्र, वैमानिकाच्या कौशल्यपूर्ण निर्णयामुळे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे जुहू विमानतळावर उतरवण्यात आले आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळासह शिंदे समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी दुपारी कल्याण-मुरबाड परिसरातील विविध कार्यक्रमांसाठी रवाना झाले होते. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथील हेलिपॅडवरून त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केले. सुरुवातीला हवामान सामान्य असल्याने प्रवास सुरळीत सुरू होता.

हेलिकॉप्टर कल्याण परिसरात पोहोचताच अचानक हवामानाने रौद्र रूप धारण केले. जोरदार वादळी वारे आणि ढगांच्या हालचालीमुळे हेलिकॉप्टर हादरू लागले. काही काळ हेलिकॉप्टर अस्थिर झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. वादळाचा वेग इतका तीव्र होता की हेलिकॉप्टर नियंत्रित ठेवणे हे मोठे आव्हान बनले होते. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच वैमानिकाने तातडीने निर्णय घेत हेलिकॉप्टर सुरक्षित मार्गाने मुंबईच्या दिशेने वळवले.

पायलटचे कौशल्य ठरले जीवदान

प्रतिकूल हवामानातही वैमानिकाने अत्यंत शांतपणे परिस्थिती हाताळली. कोणताही धोका न पत्करता हेलिकॉप्टर थेट जुहू विमानतळ येथे उतरवण्यात आले. सुरक्षित लँडिंग होताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

हेलिकॉप्टरमध्ये कोण होते?

या हेलिकॉप्टरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह एकूण आठ जण प्रवास करत होते. त्यामध्ये स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी विनायक पात्रूडकर, ओएसडी राजपूत, मुख्य सुरक्षा अधिकारी आणि इतर कर्मचारी यांचा समावेश होता. काही काळ सर्वांचा जीव टांगणीला लागला होता.

सर्वजण सुरक्षित

घटनेनंतर जुहू विमानतळावर सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाने दिली. खराब हवामानामुळे नियोजित दौऱ्यात काही प्रमाणात बदल करण्यात आल्याचेही समजते. या घटनेची माहिती समोर येताच शिंदे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र, उपमुख्यमंत्री सुरक्षित असल्याचे स्पष्ट होताच कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news