CM Devendra Fadnavis | आरोपी कुणाचाही माणूस असो, तत्काळ कारवाई करा : मुख्यमंत्र्यांचे ठाणे पोलिसांना आदेश!

राम पूर्णेकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट
Pradeep Purnekar case
Pradeep Purnekar casePudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे : उबठा पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी पोलीस तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत असतानाच प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी रविवारी ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पोलीस राजकीय दबावाखाली काम करीत असून चौकशीच्या नावाखाली मुख्य सुत्रधारांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याची व्यथा यावेळी राम याने मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. त्यानंतर फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करीत त्यांना निष्पक्ष तपास करून आरोपी कोणाचाही माणूस असो त्यांना अटक करा असे आदेश दिले.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला महिना पूर्ण झाला असून या घटनेचा अद्याप देखील उलगडा झालेला नाही. तर पोलिसांना सर्व पुरावे देऊन देखील पोलीस कारवाई करीत नसल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे. याच दरम्यान रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाण्यात आलेले असतांना राम पूर्णेकर यांनी मुख्यमंत्र्यांची आमदार निरंजन डावखरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

या भेटीत राम यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप करीत या प्रकरणात राजकीय दबावाखाली मुख्य सुत्रधारांना वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करीत असल्याचे सांगितले. पोलीस संशयित सुत्रधारांना तासन् तास बसवून फक्त चौकशीचा आव आणत आहेत असा आरोप राम यांनी यावेळी केला.

त्यानंतर मुख्यमंत्री यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. फडणवीसांनी अत्यंत कडक शब्दांत पोलीस अधिकाऱ्यांना सुनावत राजकीय दबावाला भीक न घालता निष्पक्ष तपास करा असे निर्देश दिले. आरोपी कोणाचाही माणूस असो त्यांना अटक करा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले.

मुख्यमंत्र्यांची भेट होऊ नये यासाठी दबाव - राम पूर्णेकर यांचा आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी भेट होऊ नये म्हणून राजकीय वर्तुळातून जोरदार प्रयत्न केला जात होता. मला सकाळ पासूनच सतत फोन येत होते, मात्र मी फोन बंद केला आणि अखेर मुखमंत्र्यांची भेट घेतली असे राम पूर्णेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलतांना सांगितले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून मला खूप अपेक्षा असून ते मला नक्कीच न्याय देतील असा विश्वास अशी प्रतिक्रिया देखील राम पुर्णेकर यांनी यावेळी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.