

खारघर (ठाणे) : टाटा मेमोरियल सेंटरच्या ACTREC यांच्या सहकार्याने सेंट जूड इंडिया चाइल्डकेअर सेंटर्सने आज खारघर, नवी मुंबई येथे आपल्या सर्वात मोठ्या 'होम अवे फ्रॉम होम' सुविधेचे उद्घाटन केले. ही १२ मजली, २३४ युनिट्सची इमारत टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांच्या उपस्थितीत उद्घाटित करण्यात आली.
ही सुविधा दरवर्षी बालकर्करोगाशी सामना करणाऱ्या ७०० हून अधिक कुटुंबांना मोफत व स्वच्छ निवास उपलब्ध करून देईल. पुढील २० वर्षांत ही सुविधा अंदाजे १४,००० कुटुंबांना मदत करेल अशी अपेक्षा आहे.
बालकर्करोगाचे उपचार अनेक वर्षे चालू शकतात त्यासाठी वारंवार फॉलो-अपची गरज भासते. मुंबईत येणाऱ्या कुटुंबांसाठी राहण्याची व्यवस्था करणे ही एक मोठी अडचण असते. सेंट जूड्समध्ये राहणाऱ्या कुटुंबांना त्यांचे मूल पूर्णपणे कॅन्सरमुक्त होईपर्यंत सुरक्षित राहण्याची हमी दिली जाते.
ही नवी सुविधा कॅन्सरवर उपचार घेणाऱ्या कोणत्याही मुलाला सुरक्षित आणि काळजी घेणारी राहण्याची जागा मिळालीच पाहिजे, या सेंट जूड्सच्या वचनाची साक्ष आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या माहितीनुसार, सेंट जूड्सच्या केंद्रांमुळे उपचार अर्धवट सोडण्याचे प्रमाण २००० च्या सुरुवातीला ३०% पेक्षा जास्त होते, ते आता ५% पेक्षा कमी झाले आहे.
"परळ, मुंबई येथील सेंट जुड्ससोबत आमच्या सहकार्यामुळे आम्हाला कळाले की सुरक्षित निवास हा उपचार घेणाऱ्या मुलांसाठी वैद्यकीय उपचारांचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आम्ही वारंवार सेंट जुड्ससोबत सहकार्य करत आलो आहोत.
डॉ. सुधीप गुप्ता, संचालक, टाटा मेमोरियल सेंटर
"ACTREC, खारघर येथील हे केंद्र फक्त एक सुविधा नाही हे एक वचन आहे. भारतातील कोणतेही मुल झोपण्यासाठी, जेवण्यासाठी किंवा सन्मानाने बरे होण्यासाठी जागा नसल्यामुळे कॅन्सरविरुद्धचा संघर्ष हरू नये. एका छताखाली २३४ युनिट्ससह आम्ही फक्त कुटुंबांना राहण्याची सोय करत नाही, तर आम्ही भविष्य सुद्धा वाचवत आहोत."
मनीषा पार्थसारथी, सेंट जूड इंडिया चाइल्डकेअर सेंटर्सच्या अध्यक्ष