जन्मभराची शिदोरी!

childhood school memories
childhood school memoriespudhari photo
Published on
Updated on

ज्योती मुळ्ये

शाळा सुरू व्हायचा दिवस जवळ आला की, मन कातर व्हायचं. किती दिवस शाळा चुकवली तर चालू शकतं हे बाबांना पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्नही व्हायचा. गंमत म्हणजे यात आम्हा पोराटोरांबरोबर मोठी माणसंही सहभागी व्हायची. पुढच्या सुट्टीत यायचं नक्की असूनही गाडीत बसताना पाय जड व्हायचे. आयुष्यभर हेच दिवस राहावेत असंच वाटायचं.

आमच्या पिढीचं बालपण खूप छान होतं. आमच्या काळी एप्रिल महिना उन्हाळ्याच्या झळा घेऊन नाही तर परीक्षा संपल्याची वर्दी घेऊन यायचा. खरंतर आत्तासारखीच तेव्हाही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच परीक्षा संपायची. असं असलं तरीही परीक्षा संपण्याची वाट पाहण्याचे दिवस तेव्हा खूप मोठ्ठे व्हायचे. अर्थात, आत्तेकडे किंवा मामाकडे कुडाळला जाण्याचा उत्साह त्या मोठ्ठ्या दिवसांची छोटी छोटी फुलपाखरं करायचा. गावी जायच्या नादात परीक्षा आणि दिवस कधी एकदा आटपताहेत असं व्हायचं. शेवटचा पेपर सुपरवायझरच्या हातात कोंबला की बॅग भरायला घराकडे धूम!

माझं आजोळ आणि आत्तेचं घर दोन्ही वेताळ बांबर्ड्यातच! ते गाव आणि घर हायवेला असल्यामुळे आम्हाला तिकडे पोहोचवण्यासाठी आईबाबांच्या सुट्टीची, मदतीची वाट पहावी लागायची नाही. परीक्षा संपल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांनी गाडीत बसवून दिलं की, दुपारचं जेवण आत्तेकडेच! आमच्या आत्तेच्या घरी नांदतं गोकुळ होतं. तिची तीन, जावेची चार आणि आम्ही तीन अशी दहा मुलं घराचा कबुतरखाना करायचो.

childhood school memories
Asha Bhosle : तरुण आहे आवाज अजुनी...

सकाळी कानात ढोल वाजवला तरी उठायचं नाही आणि एकदा उठलं की मोठी माणसं टेकीला आली तरी आपण जमिनीला टेकायचं नाही हा लहानपणीचा अलिखित नियम होता. घरातल्या झाडून सगळ्यांनी सलामी दिल्याशिवाय आमची ‌‘नीज‌’ काय चाळवायची नाही. त्यांच्यावर उपकार केल्यासारखं स्वत:चं आवरून पेज ढोसून झाली की ‌‘न्हावक‌’ नदीवर. रामाच्या देवळाखालच्या मळ्यातल्या चवळीच्या शेंगा ओरबाडून ‌‘राखण्याच्यो गाळयो खायत‌’ नदीत बुडकी मारताना डोईवर टळटळणारं उन्हसुद्धा थंडगार वाटायचं.

childhood school memories
New Year Celebration: नववर्षाचं आनंदगान

टोळक्यातलं मवाळ धाकटं शोधून त्याला म्हशीच्या पाठीवर बसवून दे, डोंगर तुडवत ‌‘जांबी, करंदा‌’ धुंडाळ, दारातल्या जांभळावर ‌‘झीलग्यांका‌’ चढवून दुपारची सोय कर, कैऱ्या पाडून ‌‘टकू‌’ करून खा, पैज लावून आंबे-फणसावर ताव मार, रस्त्यान जाणाऱ्या आईस्फ्रूट- वाल्याकडची कांडी खा, खडखडे लाडू फस्त कर, नाहीतर मळ्यातल्या शेंगदाण्यावर डल्ला मार अशा अनेक उपद्य्वापांनी दिवस भरलेला असायचा.

मनासारखे खेळगडी, उंडारण्याचा आनंद आणि या घरातल्या मोठ्यांच्या बंधनरहित वागणुकीमुळे कायमच इथे येण्याची ओढ असायची. शाळा सुरू व्हायचा दिवस जवळ आला की मन कातर व्हायचं. आयुष्यभर हेच दिवस राहावेत असंच वाटायचं. आज कळतं शिक्षण व स्पर्धा या चक्राला जुंपलेल्या आम्हा मुलांना खऱ्या अर्थाने बालपण ‌‘त्या दिवसांनी‌’ दिलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news