

कसारा : शहापूर तालुक्यातील अघई येथील प्लायवूड कंपनीत अल्पवयीन परप्रांतीय बाल मजुराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान ही घटना लपविण्यासाठी मृतदेह शहापूर तालुक्यातून पालघरमधील वाडा तालुक्यातील रुग्णालयात घेऊन गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की, शहापूर तालुक्यातील अघई येथील ओरिएंटल प्लायवूड कंपनीत अल्पवयीन परप्रांतीय बाल मजूर काम करत होते. त्यापैकी इमराज भाभोरे याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यत क्षेत्रात अघई ग्रामपंचायत हद्दीत सदरची कंपनी आहे. या कंपनीमध्ये जास्त कामगार हे परप्रांतीय असून यामध्ये बालमजूरांचाही समावेश असल्याचे समजते. काल दुपारनंतर कंपनीच्या हाय टेन्शन वीजेच्या लाईनवर झाडांच्या फांद्या आल्याने ते तोडण्यासाठी इमराज सनपा भाभोरे (वय 17) राहणार मध्यप्रदेश झाबुआ येथील असून याला कंपनी व्यवस्थापनाने झाडावर चढवले.
हा बालकामगार झाडाची फांदी तोडत असताना अचानक हायटेन्शन विजेचा धक्का लागून तो गंभीर जखमी झाला. इमराजला कंपनीतील लोकांनी वाडा येथील रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
महत्वाचे म्हणजे ही कंपनी शहापूर तालुक्यात असून कंपनीपासून शहापूर उप जिल्हा रुग्णालय हाकेच्या अंतरावर असताना देखील सदर बालकामगार पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत वाडा पोलिसांनी याप्रकरणी वाडा ग्रामीण रुग्णालयात धाव घेत अधिक तपास करून झीरो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपासाकरिता गुन्ह्याचे तपशील शहापूर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले आहे. दरम्यान अल्पवयीन मुलांना कामावर ठेवून त्यांच्याकडून नियमबाह्य व धोक्याची कामे करून घेऊन त्यांच्या जीवाशी खेळणार्या कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.