Chhatrapati Shivaji Maharaj Statue | डोंबिवलीत शिवरायांच्या पुतळ्याचे उद्या अनावरण

छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण
डोंबिवली, ठाणे
डोंबिवली पूर्वेकडील घर्डा सर्कल या शहराच्या प्रवेशद्वारावर छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे उद्या अनावरण करण्यात येणार आहे(छाया : बजरंग वाळुंज)
Published on
Updated on

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील घर्डा सर्कल या शहराच्या प्रवेशद्वारावर छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. एमआयडीसी भागात शहराच्या प्रवेशद्वारावरील घर्डा सर्कल येथे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रम वजा प्रकल्पातून उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी (दि.17) संध्याकाळी सात वाजता केले जाणार आहे.

डोंबिवलीच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची उभारणी केली जाईल, अशी घोषणा दीड वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्याची पूर्तता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली आहे.

अनावरण सोहळ्याला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आयुक्त डाॅ. इंदूराणी जाखड, भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण, हिंदुराष्ट्र सेना प्रमुख धनंजयभाई देसाई, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तिथीप्रमाणे सोमवारी शिवजयंतीच्या दिवशी या पुतळ्याचे लोकार्पण करण्याचे नियोजन केडीएमसीकडून करण्यात आले होते. दहा दिवसांपासून पुतळा उभारणीच्या कामाला युद्धपातळीवर सुरूवात करण्यात आली. रात्रं-दिवस हे काम सुरू होते.

पुतळ्याच्या उभारणीसाठी अत्यावश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत. 1 कोटी 44 लाख रूपये खर्चाचे पुतळा उभारणीचे काम मुंबईच्या बांद्रा येथील मे. एन. ए. कन्स्ट्रक्शन कंपनीने केले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मुलभूत सोयी-सुविधांतर्गत शासनाच्या अनुदानातून हे काम करण्यात आले आहे. राजकीय पुढाकारातून हे काम होत नसले तरीही या कामाचे प्रस्ताव केडीएमसीतील वरिष्ठांना माहितीस्तव सादर करून, बांधकाम विभागाने या पुतळा उभारणीची कार्यवाही केली आहे.

पुतळा पाहणीसह सेल्फीसाठी गर्दी उसळणार

घर्डा सर्कल परिसरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा विचार करून कोळसेवाडी वाहतूक नियंत्रण विभागाने यापूर्वीच या बेटाचा आकार (परीघ) कमी करावे किंवा काढून टाकण्याची सूचना केडीएमसीला केली होती. पोलिसांच्या सूचनेचा प्रशासनाने विचार न करता वाहतूक बेटाच्या जागेवर शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी केली आहे. हा पुतळा पाहण्यासह सेल्फी काढण्यासाठी नागरिकांची या बेटावर दररोज मोठी गर्दी जमणार आहे. नागरिकांना समोरच असलेल्या कॅप्टन विनयकुमार सचान स्मारक अथवा चौकाच्या सभोवताली असलेल्या पदपथांसह रस्त्यांवर उभे राहून पुतळा पाहणी करावी लागणार आहे.

लोकार्पण सोहळ्यासाठी वाहतूकीत बदल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी वाहतुकीत बदल केला असून या संदर्भात तशी अधिसूचना काढली आहे. रविवारी 16 मार्च रोजी रात्री 10 ते सोमवारी 17 मार्च रोजी रात्री 11 वाजेपर्यंत हा बदल करण्यात आला आहे.

डोंबिवली शहराकडून घर्डा सर्कलकडे येणाऱ्या वाहनांना शिवम हॉस्पिटल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून सदर वाहने जिमखाना रोडमार्गे इच्छित स्थळी जातील. सुयोग रिजन्सीमार्गे घर्डा सर्कलकडे येणाऱ्या वाहनांना आर. आर. हॉस्पिटल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. सदर वाहने कावेरी चौक, एमआयडीसीमार्गे इच्छितस्थळी जातील. खंबाळपाडा रोड, 90 फुटी रोड आणि ठाकुर्ली रोडमार्गे घर्डा सर्कलकडे येणाऱ्या वाहनांना बंदिश पॅलेस चौकात प्रवेश बंद करण्यात आला आहे. सदर वाहने सावित्रीबाई फुले नाट्यगृहमार्गे इच्छितस्थळी जातील. आजदे गाव आणि आजदे पाडा येथून घर्डा सर्कलकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. सदर वाहने एमआयडीसी अंतर्गत रस्त्यांनी इच्छितस्थळी जातील. पादचारी आणि वाहन चालकांनी नमूद कालावधीमध्ये घर्डा सर्कलकडील प्रवास टाळून पर्यायी मार्गांचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन वाहतुक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news