

ठाणे : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्याशी सोशल मीडियावरून संपर्क साधत त्यांना एका अज्ञात महिलेने हनीट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाटील यांनी दीड महिन्यांपूर्वी ठाणे पोलिस आयुक्तालयात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी चौकशीअंती ठाण्यातील चितळसर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. अज्ञात महिलेने विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदारांशी व्हॉटस्ॲपवरून वारंवार संपर्क साधून त्यांना व्हॉटस्ॲपवर अश्लील फोटो पाठवले. त्यानंतर तिने आमदारांकडे पैसे मागण्यास व ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली. दरम्यान, आमदार पाटील यांनी संबंधित क्रमांक ब्लॉक केला. तरीही त्या महिलेने वेगवेगळ्या क्रमांकांवरून संपर्क साधून ब्लॅकमेलिंग सुरूच ठेवले. या महिलेने वेळोवेळी पैशाची मागणी करत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी आमदारांना दिली. अखेर याप्रकरणी आमदारांनी ठाणे पोलिसात महिनाभरापूर्वी तक्रार दाखल केली. त्यानंतर ठाणे पोलिसांनी चौकशीअंती 8 ऑक्टोबरलामाहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आरोपी महिलेचा शोध घेण्यात येत आहे.