

ठाणे : मध्य रेल्वे मार्गावर दिवसेंदिवस होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीला आणि आणि वाढत्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने तोडगा म्हणून १२ डब्यांच्या २२ लोकल रेल्वे सेवांना अधिक डब्बे जोडून १५ डब्ळ्यांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान मध्य रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या २६४ फेऱ्या प्रतिदिवशी प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच या १५ डब्यांच्या लोकलमधून प्रवाशांना गर्दीतून प्रवास करण्याची गरज न भासता सहज आणि सुलभपणे प्रवास करता येणार आहे.
दरम्यान १५ डब्यांच्या लोकल रेल्वे सेवांसाठी सप्टेंबर महिन्यापासून मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांमध्ये विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि इतर रेल्वे स्थानकांचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस होऊन कल्याणला जाणाऱ्या १५ डब्यांच्या लोकलसाठी मध्य रेल्वे मार्गावरील पाच रेल्वे स्थानक विस्तारित करण्यात येणार आहे.
ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, विक्रोळी, कळवा, मुंब्रा आणि दिवा या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे आणि ठाणे रेल्वे स्थानकातून कल्याणसाठी प्रवास करणाऱ्या १५ डब्यांच्या लोकल रेल्वे सेवांसाठी ८ रेल्वे स्थानक विस्तारित करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले. यामध्ये ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, दिघा, ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर ठाणे, कळवा आणि इतर काही रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे काही अभियंत्यांना सोपवण्यात आले. प्रवाशांची रोजची गर्दी आटोक्यात आणण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. या १५ डब्यांच्या लोकलमध्ये ३० टक्के जास्त प्रवाशांची वाढ असली तरी प्रवाश्यांना सहजरित्या प्रवास करता येईल, अशी शक्यता वर्तवली आहे.
१५ डब्यांच्या लोकल सेवांना स्वयंचलित दरवाजे
मध्य रेल्वे मार्गावरून दर दिवशी तब्बल ११ ते १२ लाख प्रवासी प्रवास करत असतात. अशातच मध्य रेल्वे मार्गावर बहुतांश वेळा प्रवाशांना गर्दी, लोकल सेवांचे लेटमार्क आणि इतर समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीमध्ये कुठेही प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि प्रवाशांना दरवाजात लटकून प्रवास करण्याची गरज भासू नये म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे या १५ डब्ब्यांच्या लोकल सेवांना स्वयंचलित दरवाजे बसविण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितले. या १५ डब्यांच्या लोकलचा अनुभव घेऊन कालांतराने डाऊन मार्गावरील इतर रेल्वे स्थानकांचे विस्तारीकरण देखील येत्या काही वर्षात करता येईल, असे देखील जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी स्पष्ट केले.