

ठाणे : राज्यातील अनेक बसस्थानके बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर विकसित करण्यात येत आहेत. या एस.टी. आगारांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात २५, तर मुंबईतील बोरिवली येथील आगारात १०० खाटांचे रुग्णालय एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे.
या रुग्णालयात एस.टी. कर्मचाऱ्यांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यात येतील, तसेच ५ लाखांपर्यंतच्या शस्त्रक्रियांचा खर्च राज्यशासन करेल, अशी योजना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी जाहीर केली. बसस्थानकातच एस.टी. कर्मचारी, अधिकाऱ्यांना माफक दरात नाष्टा, जेवण कसे मिळेल, यासाठी उपहारगृह सुरू करण्याचाही मानस परिवहनमंत्र्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय सुरक्षा महिना २०२५ या उपक्रमाचे उद्घाटन शनिवारी सरनाईक यांच्या हस्ते येथील खोपट बसस्थानकात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. गुजरातमधील एस. टी. बसस्थानके चांगल्या दर्जाची आहेत, ती पाहण्यासाठी तसेच कर्नाटक परिवहन सेवेचाही कारभार उत्तम आहे, या दोन्ही राज्यातील परिवहन सेवांचे काम पाहण्यासाठी मी आणि एस.टी. महामंडळातील अधिकारी पुढील महिन्यात दौरा करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. परराज्यातील काही चांगल्या सेवांचा महाराष्ट्रातील परिवहन सेवेकडून अंगीकार करून आपल्याकडच्या प्रवाशांना चांगल्या दर्जाचा सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा दौरा उपयुक्त ठरेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.
एस.टी. च्या ताफ्यात टप्याटप्याने २ हजार ६०० नवीन बसेस येणार आहेत, एस.टी. महामंडळाचे बंद पडलेले रूट पुन्हा सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे ते म्हणाले. एस.टी. बसेसच्या अपघातांसाठी चालकांनाच जबाबदार धरले जाते. मात्र, परिवहन व वाहतूक विभागाने चालकांना सूचना देण्यासाठी रस्त्यांवर योग्य प्रकारच्या सूचना लावल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी सूचना त्यांनी वाहतूक विभागाला केल्या.