

डोंबिवली : मुंबईच्या विक्रोळी येथील एका प्रवासी महिलेची अडीच लाखाहून अधिक रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने असलेली पर्स रविवारी सकाळी बदलापूर लोकलमध्ये विसरली. ही महिला कल्याण स्थानकात उतरल्यानंतर तिला आपली पर्स लोकलमध्ये विसरल्याचे लक्षात आले. ही पर्स उल्हासनगरातील एका महिलेने ताब्यात घेऊन ती बदलापूरला पोलिस चौकीतील पोलिसांच्या स्वाधीन केली. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी विक्रोळीच्या महिलेची ही पर्स सोन्याच्या ऐवजासह परत केली. आपली पर्स जशीच्यातशी परत मिळताच गगनात आनंद मावेनासा झालेल्या या महिलेने उल्हासनगरच्या प्रामाणिक महिलेसह पोलिसांचेही आभार मानले.
कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रोळीच्या गोदरेज हिल साईड काॅलनीतील रहिवासी देवयानी अमित कुलकर्णी या रविवारी सकाळी कल्याणमधील आपल्या नातेवाईकांकडे गणपती दर्शनासाठी येत होत्या. विक्रोळी रेल्वे स्थानकात देवयानी यांनी रविवारी सकाळी साडेनऊ वाजता बदलापूर लोकल पकडली. ही लोकल कल्याण रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक चारवर सव्वादहा वाजता आली. चोरांच्या भीतीमुळे देवयानी यांनी गळ्यात सोन्याचे दागिने घालून जाण्यापेक्षा हे सोने पर्समध्ये ठेऊन ते कल्याणमध्ये पाहुण्यांच्या घरी गेल्यावर घालू असा विचार केला होता.
देवयानी घाई गडबडीत लोकलमधून उतरल्या. मात्र त्यांना आपली ८० ग्रॅम सोन्याचे दागिने असलेली सोन्याची पर्स लोकलमध्येच विसरल्याचे लक्षात आले. देवयानी यांनी तात्काळ बदलापूर लोकल मागची दुसरी लोकल पकडली आणि बदलापूरातील त्या लोकलमध्ये आपल्या सोन्याचे दागिने असलेली पर्सचा शोध घेतला. तेथे पिशवी आढळून आली नाही.
या घटनेनंतर देवयानी कुलकर्णी यांनी कल्याणच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिलेल्या सूचनांनुसार सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक धुर्वे, म्हसणे, कांबळे, उमाळे सुसर या पथकाने बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात पर्सचा शोध सुरू केला. तर दुसरीकडे वपोनि पंढरी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चव्हाण, हवालदार माने यांनी बदलापूर स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तपास चक्रांना वेग दिला.
दरम्यान उल्हासनगर कॅम्प पाचमधील सम्राट काॅलनी (नेहरूनगर) भागात राहणाऱ्या विजया देवराम कदम या बदलापूर रेल्वे स्थानकातील पोलिस चौकीत गेल्या. त्यांनी सदर पर्स बदलापूर रेल्वे स्थानकातील महिला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक धुर्वे यांच्या स्वाधीन केली. त्यानंतर देवयानी कुलकर्णी यांना पोलिस ठाण्यात बोलावून सोन्याचा ऐवज असलेली पर्स त्यांच्या स्वाधीन करण्यात आली. पर्समधील सोन्या चा ऐवज सुस्थितीत असल्याचे पाहिल्यानंतर देवयानी रेल्वे पोलिसांच्या या तत्परतेबद्दल तसेच विजया कदम यांच्याबद्दल समाधान व्यक्त केले.