

कांदिवली : सुनील गायकवाड
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात फिरायला जाण्याचा बेत आखत असाल तर या नॅशनल पार्काच्या आकर्षणात आता आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे प्रवाशांसाठी सज्ज असलेली बग्गी आणि या बग्गीचे स्टेअरिंग आदिवासी महिलांच्या हाती देण्यात आले आहे.
लहान मोठ्या सर्वांना आकर्षित करणारे हे उद्यान नव्यारूपाने पर्यटकांच्या सेवेत आले आहे. कान्हेरी गुफा, नदीतील नौकाविहार, नवीन नावारूपाला आलेली वाघ - सिंह सफारी आणि निसर्ग माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहे. नॅशनल पार्कात पर्यटकांना आतापर्यंत चालत जावे लागत असे. आता मात्र पर्यटकांना पार्कातील सर्व ठिकाणे फिरवून आणण्यासाठी चार चाकी इलेक्ट्रिक 'बग्गी' फेरी सुरू करण्यात आली आहे. महिला सक्षमीकरणाचा भाग म्हणून ही 'बग्गी' चालवण्यासाठी आदिवासी तरुण महिलांच्या हाती देण्यात आली आहे.
अशा एकूण आठ 'बग्गी' असून, त्या सर्व बग्गी नॅशनल पार्काच्या वन विभागातील पाड्यांवर राहणाऱ्या आठ आदिवासी महिला चालवतात. 'बग्गी' फेऱ्या मारून महिन्याला दहा ते बारा हजारापर्यंत कमाई या महिलांच्या हाती आता पडते आहे. एका बग्गीत पाच ते सात पर्यटक बसतात. एका व्यक्तीला पन्नास रुपये व ३ ते १२ वयाच्या लहान मुलांना पंचवीस रुपये शुल्क आकारले जाते.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारी बग्गी फेरी सुरू होते. मार्जार कुळातील प्राण्याचे माहिती केंद्र दाखवल्यानंतर मृगया चिन्ह केंद्र आणि ऑर्किडेरिया थांबा होतो. मग सिंह आणि व्याघ्र विहाराची माहिती देऊन, नौका विहार, माहिती केंद्र आदी ठिकाणे दाखवली जातात. सकाळी नऊपासून ते सायंकाळी पाचपर्यंत या बग्गी फेऱ्या पूर्ण केल्या की या आदिवासी महिला आपले घर चालवायला मोकळ्या होतात