

बदलापूर ( ठाणे ) : कुळगांव-बदलापूर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारुप मतदार यादीत शहराबाहेरील १७ हजार मतदारांची नावं असून हे मतदार मतदान करायला आले तर त्यांना पोलिंग बूथ वरच चोप देऊ, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिला आहे.
बदलापूरमध्ये प्रत्येक प्रभागात एकाच नावाच्या अनेक मतदारांची नोंदणी करण्यात आली असून दुबार मतदारांची संख्या मोठी आहे. तर बदलापूर शहरालगतच्या ग्रामीण भागातील तब्बल १७ हजार मतदारांची नावं बदलापूर शहराच्या मतदार यादीत टाकण्यात आली आहेत. खोटे डॉक्युमेंट देऊन या मतदारांची नावं बदलापूर शहराच्या यादीत टाकण्यात आली असून याबाबत निवडणूक आयोगाला तक्रार करण्यात आली असल्याचं पत्रकार परिषदेत शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी सांगितले. या सर्व मतदारांसह त्यांची नावं टाकणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी केली आहे. यामध्ये मलंगगड, बारवी परिसर, मुरबाड, शेलु, नेरळ, वांगणी, भिवंडी, शहापूर, कर्जत आणि आसपासच्या ग्रामीण भागातल्या मतदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहितीही म्हात्रे यांनी दिली. तसंच हे मतदार जर मतदानाच्या दिवशी बोगस मतदान करायला आले, तर त्यांना चोप देऊ असा इशारा शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिला आहे. मतदानाच्या दिवशी जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असेल, असंही वामन म्हात्रे म्हणाले आहेत. बदलापूर शहरात जर अशा पद्धतीने बोगस मतदारांची नोंदणी करून कोणी निवडणुकीच्या राजकारणात स्थानिक पदाधिकाऱ्यांना संपवण्याचा कट करत असेल तर त्यांना शिवसेनेच्या पद्धतीने धडा शिकवू असा इशारा दिला.
मतदानाच्या दिवशी बदलापूरच्या बॉर्डर शिवसैनिक सील करणार
शहरात मतदानाच्या दिवशी शिवसैनिक शहराच्या बॉर्डर सील करणार असल्याचं शिवसेना शहरप्रमुख आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी जाहीर केलं आहे. जर शहरात एकही बाहेरून बोगस मतदार आला तर शिवसैनिक त्याला वेशीवरूनच परत पाठवतील आणि जर त्यातूनही बोगस मतदानाचे प्रकार घडले तर त्या पोलिंग बूथवर आम्ही संबंधित बोगस मतदारांना चूक देऊ असा थेट इशारा वामन म्हात्रे यांनी दिला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला निवडणूक यंत्रणा जबाबदार असेल असे ते म्हणाले
डॉक्टर नामांकित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदवली बोगस नाव
बदलापूर शहरातील काही नामांकित डॉक्टर आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी खोटी कागदपत्र तयार करून करून लाईट बिल आणि आधार कार्ड जोडून आपली मतदार यादीतील नाव दुसऱ्या प्रभागात नोंदविल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी गटनेते श्रीधर पाटील यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने जर ही नाव वगळली नाही, तर ज्या डॉक्टर संस्थेचे पदाधिकारी आणि शहरात राहणारे अनेक बडे सरकारी अधिकारी यांचा पर्दाफाश करणार असल्याचं श्रीधर पाटील यांनी सांगितले.
उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींचे नाव तीन ठिकाणी
उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती उज्ज्वल देशमुख यांचं मतदार यादीत तीन ठिकाणी नाव असल्याचा गौप्यस्फोट या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी केला. बदलापूर जवळील चोण या त्यांच्या मूळ गावी, तसेच बदलापूर शहरातील मांजर्ली आणि ठाणे महानगरपालिका हद्दीतही उज्ज्वल देशमुख यांची मतदार नोंदणी असल्याचे वामन म्हात्रे यांनी सांगितले.