

सतीश तांबे
कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या मैदानात अनपेक्षित आघाडी घेतली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच भाजपच्या दोन महिला उमेदवारांसमोर इतर कोणत्याही पक्षाने किंवा अपक्ष उमेदवाराने अर्ज न भरल्याने, या दोन्ही जागांवर भाजपचे खाते उघडले असून रेखा चौधरी आणि आसावरी नवरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या १२२ जागांसाठी मंगळवारी (दि.३० डिसेंबर) अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असताना दोन प्रभागांत मात्र भाजपाचा वरचष्मा पाहायला मिळाला:
कल्याण पूर्व (पॅनल क्र. १८-अ): नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) या राखीव जागेसाठी भाजपकडून रेखा राजन चौधरी यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी वरुण कुमार सहारे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
डोंबिवली पूर्व (पॅनल क्र. २६-क): सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी भाजपकडून आसावरी नवरे रिंगणात होत्या. येथेही इतर कोणत्याही पक्षाने उमेदवार न दिल्याने नवरे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
जरी या दोन्ही जागांवर भाजप उमेदवारांविरुद्ध कोणीही उभे राहिले नसले, तरी निवडणूक नियमांनुसार अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या विजयाची अधिकृत घोषणा केली जाईल. मात्र, तांत्रिकदृष्ट्या भाजपने निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानापूर्वीच दोन जागा जिंकून विरोधकांवर मनोवैज्ञानिक दबाव निर्माण केला आहे.
केडीएमसीच्या एकूण ३१ पॅनलमधील १२२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. शेवटच्या दिवसापर्यंत सर्वच जागांवर चुरस पाहायला मिळत होती, मात्र कल्याण पूर्व आणि डोंबिवली पूर्वेतील या दोन जागांनी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे.