

भिवंडी : भिवंडी शहरातील कल्याण नाका ते राजनोली नाका दरम्यान असलेल्या स्व.बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर रविवारी रात्री एक भीषण अपघात झाला.ज्यामध्ये टायर पंक्चर झाल्याने उभ्या असलेल्या कारला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण थेट उड्डाणपुलावरून खालील कल्याणरोड रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक जैन हा आपली कार (क्रमांक एम एच 02 ए एस 3636) घेऊन कल्याण येथे रेल्वेने येणार्या नातेवाईकांना घेण्यासाठी रात्री अकरा वाजताच्या सुमारास निघाला होता. उड्डाणपुलावर येताच कार पंक्चर झाल्याने लक्षात आल्याने कार उड्डाणपुलावर एका बाजूला घेऊन ते टायर बदली करीत होते.
त्याच सुमारास स्प्लेंडर (क्रमांक एम एच 04 एम जी 0136) या भरधाव दुचाकीवर तिघे युवक येत असताना कार उभी असल्याचे दुचाकी चालकास दिसून न आल्याने ती थेट कारला येऊन धडकली. ही धडक एवढी जोरदार होती की कारसह दुचाकीचे नुकसान होत दुचाकी चालक मुजाहिद अन्सारी हा कारवर फेकला गेला. तर मागे बसलेला सहकारी राजेश कुमार यादव हा थेट दुचाकीवरून उडून उड्डाणपुला खालील रस्त्यावर फेकला गेला. या अपघातात तिसरा सहकारी अहमद रजा हा या दुर्घटनेनंतर तेथून पळून गेला.
या अपघातातील गंभीर जखमी दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी अभिषेक जैन यांच्या तक्रारीवरून भिवंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.