

भिवंडी : बनावट नोटांची अदलाबदल करण्यासाठी भिवंडीत आलेल्या नाशिकच्या दुकलीला बेड्या ठोकण्यात भिवंडी गुन्हे शाखा घटक २ ला यश आले आहे. त्यानुषंगाने पोलिसांनी सापळा कारवाई दरम्यान दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. शिवानंद ज्ञानेश्वर कोळी (२४), राहुल रामदास शेजवळ (२४, दोघे रा. नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर रोजी बनावट नोटांची अदला बदलीसाठी काही इसम भिवंडीत येणार असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखा घटक-२ च्या पोलिस पथकाला मिळाली होती. त्यानुषंगाने वपोनि जनार्दन सोनवणे यांनी त्यांच्या सपोनि श्रीराज माळी, मिथुन भोईर, पोउनि रविंद्र बी. पाटील, रामचंद्र जाधव, सपोउनि सुधाकर चौधरी, सुनिल साळुंके, पोह निलेश बोरसे, प्रशांत राणे, प्रकाश पाटील, सुदेश घाग, रंगनाथ पाटील, शशिकांत यादव, किशोर थोरात, मपोहवा माया डोंगरे, पोशि अमोल इंगळे, भावेश घरत, विजय कुंभार, सर्फराज तडवी, चापोशि रविंद्र साळुंखे आदि पोलिस पथकासह चाविंद्रा रोड येथील मिल्लत नगर मधील ममता हॉस्पिटल च्या बाजूला असलेल्या फरहान हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला.
यानंतर शिवानंद आणि राहुल हे दोघे इको फोर्ड गाडीतून संशयित रित्या जाताना आढळून आल्याने कारची पंचांसमक्ष केलेल्या झाडझडती कारवाईत गुन्हे शाखेने आरोपींकडून लहान मुलांच्या खेळण्यातील ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे ४८ बंडल, १ पिस्तूल, १ जिवंत काडतूस आणि इको फोर्ड गाडी असा एकूण ६ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल केला असून दोघांच्या विरोधात निजामपूरा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे.
दरम्यान सदर गुन्ह्याच्या प्राथमिक तपासात आरोपी हे जप्त नोटा खऱ्या भासवून बदली करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोणीही अशा प्रकारच्या बनावट नोटा बदली करण्याच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन गुन्हे शाखेने नागरिकांना केले असून कुठे असा प्रकार आढळल्यास त्याबाबत तात्काळ संबंधित पोलिस ठाण्यास अथवा गुन्हे शाखेस तशी माहिती देण्याचे सांगितले आहे. या घटनेचा पुढील तपास पोउनि रविंद्र बी. पाटील करीत आहेत.