Bhiwandi ST Bus Fire: खडवली येथे बसला भीषण आग; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे ३० ते ३५ प्रवाशांचे वाचले प्राण

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Bhiwandi ST Bus Fire
Bhiwandi ST Bus FirePudhari
Published on
Updated on

कल्याण: भिवंडी आगाराच्या खडवली–पडघा या नियमित फेरीवरील एसटी बसला शनिवारी (दि. ११) सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास खडवली येथे अचानक भीषण आग लागल्याने काही मिनिटांतच संपूर्ण बस जळून खाक झाली.

मात्र, स्थानिक रिक्षाचालक शैलेश जाधव यांच्या सतर्कतेमुळे बसचालकाला वेळेत आग लागल्याची माहिती मिळाली. त्यामुळे बसमधील सुमारे ३० ते ३५ प्रवाशांना तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Bhiwandi ST Bus Fire
Food Adulteration: कल्याण-डोंबिवलीत खाद्यसुरक्षा धोक्यात; निकृष्ट, भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री

मिळालेल्या माहितीनुसार, खडवली–पडघा या सायंकाळी ६ वाजताच्या नियमित फेरीवरील एसटी बस खडवली परिसरातून जात असताना रिक्षाचालक शैलेश जाधव यांच्या निदर्शनास बसच्या पुढील भागातून धूर व आगीच्या ज्वाळा दिसल्या.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ बसचालकाला गाडीला आग लागल्याची सूचना दिली. बसचालकानेही प्रसंगावधान राखत बस तातडीने थांबवली. दोन्ही दरवाज्यांतून सर्व प्रवाशांना त्वरित खाली उतरवले. प्रवासी सुरक्षित बाहेर पडताच काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण बसला वेढा घातला.

Bhiwandi ST Bus Fire
Warehouse Sealed: ठाण्यात मुदतबाह्य पदार्थ सोसायटीत फेकणाऱ्या कंपनीचे गोदाम सील!

बसमध्ये उपलब्ध असलेल्या अग्निशामक यंत्राच्या सहाय्याने बसचालकाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग वेगाने पसरल्याने त्याचा काहीही उपयोग झाला नाही. काही मिनिटांतच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेनंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

स्थानिक नागरिकांनी पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच कल्याण येथून अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. मात्र, तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एसटी बसचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार बसच्या इंजिन विभागात तांत्रिक बिघाड झाल्याने आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तपासानंतरच याबाबतचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेत वेळीच सतर्कता दाखवून बसचालकाला सूचना देणारे रिक्षाचालक शैलेश जाधव हे संभाव्य मोठी दुर्घटना टाळण्यात महत्त्वाचे ठरले. त्यांच्या धाडसाचे आणि प्रसंगावधानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.- कंचन कुंभार प्रवासी, पडघा

बसच्या पुढील भागातून धूर आणि आग दिसताच मी तात्काळ बसचालकाला गाडीला आग लागल्याची सूचना दिली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यास सांगितले. वेळेत सूचना दिल्यामुळे मोठी दुर्घटना टळली, याचे समाधान वाटते.

- शैलेश जाधव, रिक्षाचालक, खडवली

मी खडवली–पडघा या बसमधून प्रवास करत होते. बसला आग लागताच प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. त्या गोंधळात मी एका लहान बाळाला सुरक्षित बाहेर काढले. मात्र, अशा प्रसंगी बसचालक व संबंधित यंत्रणेने अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.

- कंचन कुंभार प्रवासी, पडघा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news