

भिवंडी : मनपा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसने ३० तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने १२ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्ष प्रयत्नशील राहणार आहेत.
विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार पक्ष स्वतंत्र लढले होते. मात्र निवडणूक फॉर्म भरण्याच्या शेवटच्या क्षणी समाजवादीचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी काँग्रेसला साथ देत पूर्व मधून काँग्रेसचे जवळपास २४ उमेदवार निवडून आणले आहेत. भिवंडी पूर्वमध्ये समाजवादीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी व आमदार रईस शेख यांच्यातील अंतर्गत बाद उफाळल्याने शेख यांनी कोंग्रेसला साथ दिली. आझमी आणि शेख यांच्यातील वादाचा फटका समाजवादीला बसला असून समाजवादीला अवघ्या ६ जागा जिंकता आल्या. त्यातही ६ जागा या भिवंडी पश्चिम मतदार संघातील असून पूर्वेत समाजबादीला एकही जागा जिंकता आली नाही. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने १२ उमेदवारांना देखील आ. शेख यांनीच छुपा पाठिंबा दिला होता. त्यामुळे हे दोन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे.
पालिकेवर सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या भाजप शिंदेसेनेच्या युतीला अवघ्या ३४ जागा जिंकता आल्या. भाजपच्या एकूण २२ उमेदवारापैकी ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर शिंदेसेनेला १२ जागांवर विजय मिळाला आहे.
कोणार्क विकास आघाडीचे चारही उमेदवार प्रभाग एक मधून निवडून आले असून कोणार्कने भाजपच्या चारही उमेदवारांचा पराभव केला असून त्यात भाजप आमदार महेश चौघुले यांचा मुलगा मित चौघुले यांचाही पराभव करत कोणार्कने या प्रभागात आपले अस्तित्व पुन्हा सिद्ध केले आहे.
माजी महापौर जावेद दळवी यांच्या भिवंडी विकास आघाडीने तीन जागांवर विजय मिळविला आहे. तर प्रभाग २२ मध्ये भाजपचे जैष्ठ नगरसेवक शाम अग्रवाल यांचा अपक्ष उमेदवार नितेश एनकर यांनी २१ मतांनी पराभव केल्याने येथे अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.