

ठाणे : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन केले, त्यांना आता मोठा फटका बसला आहे. निवडणूक लढवूनही निवडणूक खर्चाचा अधिकृत हिशेब सादर न करणाऱ्या २४ उमेदवारांना कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पुढील ३ वर्षांच्या कालावधीसाठी निवडणूक लढवण्यास आणि महानगरपालिकेचे सदस्य होण्यास अपात्र घोषित केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आपल्या खर्चाचा लेखाजोखा देणे बंधनकारक असतानाही, वारंवार दिलेल्या संधीचा फायदा न घेणाऱ्या या उमेदवारांवर अखेर कायदेशीर बडगा उगारण्यात आला आहे.
भिवंडी-निजामपूर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक-२०२६ करिता एकूण ४३८ उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व उमेदवारांनी विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशेब तपासणी अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक होते. मात्र, तपासणी अधिकारी यांनी पाठवलेल्या २७ एप्रिलच्या अहवालानुसार, २४ उमेदवारांनी मुदतीचे उल्लंघन करत खर्चाचा तपशील सादर केला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने या उमेदवारांना अपात्र ठरवण्यासाठीचा प्रस्ताव नमुना सहा अन्वये कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवला होता.
याबाबत दोनदा झालेल्या सुनावणीच्या वेळी संबंधित उमेदवार अनुपस्थित राहिले. त्यामुळे रुबल अग्रवाल यांनी आज कारवाईचे आदेश दिले.
या आदेशानुसार अपात्र ठरवण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये कृतिका शरद पाटील, गायकवाड विजया अशोक, शरद पाटील, अन्सारी रेहान मुस्ताक, तेजश्री सागर पाटील, शेख शोएब सलीम, सलीम अन्सारी, अन्सारी जरीना रफीउजमा, अन्सारी तुंबा शकील, खान रिजवान रहिमुल्लाह, खान रविश हाजी ईखलाक, हाशमी इमरान अहमद इस्तेयाक, मोमीन नदीम मोहम्मद मुस्तकिम, अन्सारी कमरुन्निसा कासीम, अजीम रहेमान शेख, अनुशा श्रीनिवास वेंगल, विजय पुरुषोत्तम कारमपुरी, घोईल रीतीषा महेश, तांबे अस्मिता अरुण, गायकवाड नितेश वामन, अंसारी सोहेल जावेद अहमद, निरबान मोहसिन जाकीर हुसैन, खान आजम मुक्त्तार आणि म्हात्रे सुशांत भास्कर या उमेदवारांचा समावेश आहे.