

भिवंडी (ठाणे) : संजय भोईर
भिवंडीतील अनधिकृत गोदामांसह या गोदामातील साठविल्या जाणार्या अनधिकृत केमिकल गोदामाला लागलेल्या आगी संदर्भात विधान परिषदेत आमदार निरंजन डावखरे यांनी प्रश्न उपस्थित केला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएकडून या भागातील गोदामांचे हवाई सर्वेक्षण करून तपासणी करीत असतानाच परवानगी देणार्या सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा या भागातील गोदामांचा प्रश्न चर्चेत आला आहे.
1980 च्या सुमारास तालुक्यातील राहनाळ, पूर्णा, काल्हेर या भागात सुरू झालेला गोदाम व्यवसाय पाहता पाहता संपूर्ण तालुका व्यापून बसला आणि आज भिवंडी तालुक्याचा ग्रामीण भाग हा लॉजिस्टिक हब म्हणून ओळखला जाऊ लागला. साहजिकच या निमित्ताने या भागात मोठी आर्थिक सुबत्ता आली आणि त्या आर्थिक सुबत्तेमधूनच या भागात अनधिकृत बांधकाम करण्याचे प्रमाण सुद्धा तेवढेच वाढलेले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात सुमारे 50 हजारहून अधिक गोदामे उभारण्यात आली आहेत. या भागात सुरुवातीला स्थानिक ग्रामपंचायत परवानगीने गोदाम बांधकाम होत असत.2009 मध्ये
या भागाच्या विकासाची जबाबदारी एमएमआरडीए प्राधिकरणाकडे सोपवली. साहजिकच एमएमआरडीएकडे बांधकाम परवानगीचे अधिकारी गेले. सुरुवातीला ग्रामपंचायतीच्या जुन्या तारखांवरील परवानगी दाखवून बांधकामे झाली. पण, आज ही मोठ्या प्रमाणावर होणार्या दुर्लक्षामुळे या भागातील अनधिकृत बांधकामे थोपविण्यात अपयशी ठरले आहे.
ग्रामीण भागात गोदाम असल्यास येथून संपूर्ण देशात मालाची ने आण करणे सहज शक्य असते. तर जेएनपीटी बंदर जवळ असल्याने आयात होणारा व निर्यात होणारा माल या ठिकाणी साठवणूक करण्याची गरज वाढल्याने येथील गोदाम व्यवसाय फोफावत गेला. पण, नियोजनाचा अभाव व अनधिकृत बांधकामांमुळे याभागात अनेक दुर्घटना, आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत.
या भागात खर्या अर्थाने 2009 नंतरच गोदाम बांधकाम व्यवसाय फोफावला. अनेक सेवा व्यवसाय करणार्यांनी मोठमोठाली गोदामे या भागात थाटली. लाखोंना रोजगार मिळाला, आर्थिक उलाढाल वाढली. परंतु या भागाकडे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील अनधिकृत गोदामांची संख्या भरमसाट असून 525 अनधिकृत वाढीव बांधकाम केलेल्या गोदामांची यादी महसूल विभागाकडे आहे. यातील काही गोदामांवर महसूल विभागाने सील बंद कारवाई केली होती. मात्र हे सील काढण्यात येतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर येथील गोदामांवर कारवाई करणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागात गोदामपट्टा मोठ्या प्रमाणात विकसित झाल्याने देशासह विदेशातील बहुतेक नामवंत कंपन्यांची गोदामे भिवंडीत पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागाला देखील या गोदामामुळे आर्थिक सुबत्ता लाभली आहे. विशेष म्हणजे या गोदामांमध्ये विविध कंपन्यांच्या वस्तूंबरोबरच काही ठिकाणी अनधिकृत केमिकलची साठवणूक देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. या केमिकलच्या गोदामांना आगी लागण्याच्या दुर्घटना देखील येथे वारंवार घडत असतात. त्यामुळे भविष्यात भिवंडीत भोपाळसारखी परिस्थिती ओढावू नये, अशी चिंता स्थानिक रहिवासी वारंवार व्यक्त करतात मात्र अशा होणार्या घटना पाहता अनधिकृत गोदामांकडे शासकीय यंत्रणांबरोबरच, संबंधित प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे.