

भिवंडी : संजय भोईर
भिवंडी तालुक्यातील राहनाळ गावच्या हद्दीत स्वागत कंपाउंड परिसरात फर्निचर गोदामाला शनिवारी (दि.26) रोजी पहाटे लागलेली आग दुसर्या दिवशी रविवारी (दि.27) रोजी 32 तासानंतर ही धुमसत होती. या भीषण आगीत 12 गोदामांसह संपूर्ण इमारत भक्षस्थानी पडली असून आगीच्या ज्वाळांनी इमारतसुद्धा कोसळली आहे.
आगीचे कारण अस्पष्ट असले तरी ही आग पुढील काही दिवस धुमसतच राहील, पण अशा गोदामांमधून जी काळजी घेणे गरजेचे आहे. ती घेण्यासाठी कोणतीही चर्चा होत नाही तर शासकीय यंत्रणासुद्धा त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने अशा आगींच्या घटनांमध्ये कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून जात असतानाच इमारतींचेही नुकसान होते
दुर्घटना घडलेल्या इमारतीमध्ये एकूण 12 गोदाम होती. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कच्चा माल व साहित्य साठवलेले होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार इमारतीची लिफ्ट तसेच जिना येथे सुद्धा प्लायवूड साठवणूक केलेली होती. लिफ्ट असलेल्या ठिकाणीच सर्वप्रथम शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे. जर हीच आग कामाच्या वेळी दिवसा लागली असती
तर येथील कामगारांना बाहेर पडणे मुश्किल झाले असते. गोदाम इमारतीची साठवण क्षमता व इमारतीची मजबुती ही कधीही तपासली जात नसल्यामुळे अशा इमारतीमधून क्षमतेपेक्षा अधिक शेकडो टन साहित्य साठविण्यात येते. अशा इमारतींतून अग्निसुरक्षा यंत्रणा अथवा गोदाम संकुलात पाणी साठवलेले नसल्याने अग्निशमन यंत्रणांचे आग विझविण्याचे प्रयत्न तोकडे पडतात. भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाची जबाबदारी एमएमआरडीए प्रशासनावर आहे. येथील आग विझविण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आजही घटनास्थळी तैनात असून आग पसरणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
दरम्यान गोदामातील आग घटनेच्या दुसर्या दिवशीही धुमसत असताना इमारतीचा उर्वरित भाग ही कोसळण्याची भीती असताना संपूर्ण इमारतीचे पाडकाम करणे हे गरजेचे असल्याने आता हे काम कोण करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.