

भाईंदर (ठाणे) : उत्तनच्या नवीखाडी परिसरात राहणाऱ्या ग्लॅस्टन गिल्बर्ट घोन्साल्वीस या ३२ वर्षीय तरुणाला चुकीचे इंजेक्शन दिल्याने त्याचा १ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मृत्यू झाला. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून चुकीचे इंजेक्शन देणाऱ्या फय्याज आलम नामक डॉक्टरवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख बर्नड डिमेलो, मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे व काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष राकेश राजपुरोहित यांनी आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्यासह पोलिसांकडे केली आहे.
उत्तन परिसरातील अस्वच्छतेमुळे तेथील अनेकांचा डेंग्यू सदृश आजाराने मृत्यू झाल्याची बाब उघड होत असतानाच येथील ग्लॅस्टन नामक ३२ वर्षीय तरुणाचा चुकीच्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाल्याची घटना १ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ग्लॅस्टनला ३१ ऑगस्ट रोजी साधारण ताप आला होता. त्यावर उपचार करण्यासाठी तो परिसरातील फय्याज आलम नामक डॉक्टरकडे गेला. त्यावेळी डॉक्टरने त्याला काही औषधे देऊन परत पाठविले. औषध घेऊनही बरे वाटले नाही म्हणून तो पुन्हा त्याच डॉक्टरकडे गेला. यावेळी डॉक्टरने त्याला मलेरिया झाल्याचा संशय व्यक्त करीत सलाईन लावले. सलाईनमध्ये त्याने काही इंजेक्शन मिक्स केले. यानंतर ग्लॅस्टनची तब्येत सुधारण्याऐवजी ती आणखी बिघडली. तो वेड्यासारखा वागून रस्त्यावर पळत सुटला तसेच त्याला लघुशंका, शौचाला होऊ लागले. आणि १ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
यावरून डॉक्टरने ग्लॅस्टनवर चुकीचा उपचार करून त्याला चुकीचे इंजेक्शन दिल्याचा संशय त्याच्या घरच्या मंडळींना आला. त्याची वाच्यता होताच शिवसेनेचे शहर प्रमुख बर्नड डिमेलो यांनी पालिका आयुक्तांना पत्रव्यवहार करीत उत्तनमधील सर्व डॉक्टरांची चौकशी करून बोगस डॉक्टर आढळ्यास त्याचे दवाखाने बंद करण्याची मागणी केली. तसेच मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी ग्लॅस्टनच्या कुटूंबाची भेट घेत संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी पालिकेसह पोलिसांकडे केली. तसेच काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष राकेश राजपुरोहित यांच्या नेतृत्वाखालील शिस्टमंडळाने पालिका आयुक्तांसह सहाय्यक पोलीस आयुक्तांची भेट घेत संबधित डॉक्टरची चौकशी करून त्यात त्याचा बोगस वैद्यकीय व्यवसाय असल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिष्टमंडळात मुख्य प्रवक्ता प्रकाश नागणे, प्रवक्ता जय ठाकूर, ब्लॉक अध्यक्ष व्हेलेरियन पॅड्रिक, उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष उमेश यादव, दीपक इटकर आदींचा समावेश होता.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालिका आयुक्तांनी वैद्यकीय पथक तर पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे फय्याज आलम नामक डॉक्टरच्या उत्तन चॅरिटेबल ट्रस्ट क्लिनिकवर गुरुवारी धाड टाकून त्याच्या वैद्यकीय व्यवसायाची कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केल्याचे वैद्यकीय सुत्रांकडून सांगण्यात आले. ग्लॅस्टनच्या मृत्यूमुळे स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.