

भाईंदर (ठाणे) : राजू काळे
भाईंदर येथील उत्तन, पाली समुद्रातील उधानाच्या भरतीमुळे उसळलेल्या लाटांमुळे किनार्यावरील जेट्टी, रस्ते, विजेचे मोठे पोल (हायमास्ट) आदींचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. यावर तत्काळ उपाययोजना करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.
मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व समुद्रातील प्रचंड भरती-ओहोटीमुळे उत्तन, पाली तसेच आजूबाजूच्या समुद्र किनार्यांची मोठी धूप झाली आहे. यामुळे किनार्यावरील अनेक राहती घरे, मासळी सुकविण्याच्या जागा, मासेमारीसाठी उपयोगात असलेली जेट्टी, किनार्याकडे जाणारे रस्ते, पालिकेने उभारलेले हाय-मास्टचे (विजेचे मोठे पोल) समुद्रातील उधानाच्या भरतीच्या लाटांच्या तडाख्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे ऐन मासेमारी हंगामामध्ये मच्छिमारांना आपला व्यवसाय करणे व किनार्यावर ये-जा करणे अत्यंत जिकिरीचे ठरू लागले आहे. नुकसानग्रस्त जेट्टीचा परिणाम मासेमारीसाठी समुद्रात जातेवेळी बोटींमध्ये अत्यावश्यक साहित्य नेण्यास मासेमारीनंतर किनार्यावर परतलेल्या बोटीतील मासळी किनार्यावर आणण्यावर होणार आहे. तसेच उत्तन येथील रिक्षा स्टँड मार्गे जाणार्या रस्त्याची (गणपती विसर्जनासाठी वापरला जाणारा रस्ता) देखील स्थिती अतिशय खराब झाली आहे. अगोदरच समुद्रात होत असलेल्या विविध बांधकामांमुळे सामुद्री क्षेत्र कमी होत चालल्याने त्यातील भरतीचे पाणी किनार्यावरील वसाहतींमध्ये शिरू लागले आहे. तर काही ठिकाणच्या समुद्रातील पाणी थेट वाहतुकीच्या रस्त्यांवर येऊ लागल्याने यावरून ही भविष्यातील विनाशाची वा धोक्याची घंटा असल्याचे स्पष्ट होत आहे.
सध्या समुद्रात घडणार्या घडामोडींचा फटका किनार्यावरील लोकवस्त्यांना बसू लागला आहे. अनेकदा समुद्रातील भरतीचे पाणी किनार्यावरील लोकांच्या घरांत शिरू लहले आहे. यंदा तर किनार्यावरील विविध बांधकामांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी पालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यावर वेळीच कार्यवाही न झाल्यास भविष्यात प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागून त्याचा परिणाम स्थानिक मच्छिमारांच्या मासेमारी व्यवसायावर देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बर्नड डिमेलो, अध्यक्ष, उत्तन-पाली मच्छिमार सहकारी संस्था
यापूर्वी देखील उत्तनच्या पातान बंदर परिसरातील लोकवस्तीत समुद्राचे पाणी शिरून लोकांच्या घरातील साहित्याचे नुकसान झाले होते. त्याचा पंचनामे तहसील कार्यालयाकडून करण्यात आले. तर यंदाच्या उधाणाच्या भरतीच्या लाटांमुळे किनार्यावरील विविध बांधकामांचे नुकसान झाल्याने या नुकसानग्रस्त ठिकाणांची पालिकेकडून तत्काळ पाहणी करून पडझड झालेल्या ठिकाणांची दुरुस्ती करण्यात यावी. तसेच या ठिकाणी संरक्षणात्मक उपाययोजना करून किनार्यावरील लोकवस्त्यांना तसेच मच्छीमारांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.