

मिरा रोड : भाईंदर पश्चिमेच्या जय बजरंग नगर येथे रविवारी रात्री 10 च्या सुमारास एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींना जेवणातून विषबाधा झाल्याने त्यांना उलट्या व मळमळ होऊन जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने ते उपचारासाठी रुग्णालयात गेले. त्यावेळी एका तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कुटुंबातील 5 सदस्य हे शुद्धीवर आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी प्राथमिक दृष्ट्या अन्नातून विशबाधा झाल्याचे सांगितले आहे.
भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्ली परिसरातील जय बजरंग नगर येथील रमेश मौर्या ( 30 ) , पत्नी नीलम मौर्या ( 28 ) , मुलगी चाहत मौर्या ( 8 ) , मुलगी अनामिका ( 6 ) व राजकुमार मौर्या त्याचे कुटुंबीय यांच्यावर भाईंदरच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी शुद्धीवर आलेल्या रमेश मौर्या यांचा जबाब घेतला मात्र ते केव्हा बेशुद्ध झाले हे काहीही आठवत नाही. या दुर्घटनेत दीपाली मौर्या (3 ) या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशी अहवालात त्या कुटुंबाला अन्नातून विषबाधा झाल्याचे आढळून आले आहेरएकाच कुटुंबातील सहा व्यक्ती एकाच वेळी बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. त्यामुळे भाईंदर पोलिसांना घात पात किंवा अन्य कोणी सामूहिक खून करण्याच्या उद्देशाने केले आहे का याचा संशय आल्याने त्यांनी माहिती फॉरेन्सिक पथकाला कळवून त्यांना बोलावले. त्यानंतर त्यांनी घरातील आणलेले वडापाव व अन्नाचे नमुने, तसेच उलटी केलेले नमुने हे तपासणी साठी घेतले आहेत. त्यासोबतच त्या घरात गॅस गळती झाली आहे का याचीही चौकशी करण्यासाठी भाईंदर पोलिसांनी भाईंदर पश्चिमेच्या गॅस डिस्ट्रिब्युटर यांना तपासणी करण्यास सांगितले परंतु त्या ठिकाणी गॅस गळती झालेली नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहेत.