भांडुप : पुढारी वृत्तसेवा : आरे कॉलनी येथील तरूण आणि तरुणीचा विहार तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २६) रात्री घडली. संदीप काशिनाथ टबाले (वय ४०) आणि एका अठरा वर्षाच्या तरुणीचा बुडून मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी संध्याकाळी पाचच्या दरम्यान आरे कॉलनी मधील आंबावाडी येथे रहाणारे संदीप टबाले, सागर टबाले, यश नार्वेकर आणि एक तरुणी पोहण्यास आरे कॉलनी, पवईच्या मध्यावर असलेल्या विहार तलावात गेले होते. मात्र, पोहत असताना पाण्याचा अंदाज आला नाही. आणि त्यात संदीप आणि ती तरुणी पाण्यात बुडाली.
यावेळी इतर दोघांनी याची माहिती आरे पोलिसांना दिली. पोलिसांनी अग्निशमन दल आणि पालिका आणि मुलुंड पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू केला. आज सकाळी या दोघांचे मृतदेह हाती लागले. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मुलुंड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचलंत का ?