

ठाणे : ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ असलेल्या कोपरी येथील सीएनजी पंपाजवळ आज रात्री १० च्या सुमारास बेस्ट बसचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात ३० प्रवासी बचावले असून ५ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच ठाणे पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, शहर वाहतूक विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. दरम्यान, जखमी प्रवाशांना ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बोरिवली ते ठाणे स्टेशन पूर्व येथे जाणारी बेस्ट बस आज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ईस्टर्न एक्सप्रेस हायवे कोपरी येथे आली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्ता दुभाजकावर धडकून अपघात झाला. बसमध्ये अंदाजे ३० प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ४ ते ५ प्रवाशांना दुखापत झाली आहे. सर्व प्रवाशांना बस मधून उतरविण्यात आले. तर जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी दोन व्यक्तींना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. यामध्ये राजेश मालुसरे (२७ ) याला कपाळाला व पाठीला दुखापत झाली आहे तर सुवास वाघमारे(४८) यांच्या नाकाला दुखापत झाली आहे. घटनास्थळी सर्विस रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून सदर अपघात ग्रस्त बस बाजूला करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.