

खानिवडे (ठाणे) : वसई म्हणजेच सुप्रसिद्ध चवदार केळीचे शहर, असा एकेकाळी नावलौकिक असलेल्या वसईत आता केळींची लागवड मोठ्या प्रमाणात घटली असली तरी आजही अनेक शेतकरी केळीचे उत्पादन घेत आहेत. मात्र या केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आता एक नवे संकट पुढे उभे ठाकले आहे. यंदा केळींचे जे उत्पादन तयार झाले आहे त्याचे घड काळवंडले आहेत.
यातील हजारी प्रकारातील केळीचे घड जे साधारण तीस किलोच्या आसपास लागले आहेत, ते काळे आले आहेत. यामुळे त्याचा बाजारात योग्य दर मिळत नाही. खूपच जास्त काळ लांबलेला पाऊस याला कारणीभूत असावा, असा कयास शेतकरी लावत आहेत. मात्र वसई कृषी विभागाने याची पाहणी करून हे नेमके कशामुळे झाले आहे, त्याचा शोध घेऊन उपाययोजना काय करावी, याची माहिती देण्यात यावी, अशी मागणी नंदाखाल, वटार येथील लुईस डिमेलो या शेतकऱ्याने केली आहे. दरम्यान एन्जोलो रुमाव यांच्या शेतात याच हजारी जातीच्या केळीला आलेल्या घडामध्ये केळी बारीक, जुळी व तिळी लागली आहेत. त्यामुळे व्यापारी ती घेत नाहीत. लांबलेल्या व अवकाळी पावसाचा हा परिणाम असल्याचे याबाबत शेतकरी सांगत आहेत.
हा यंदाच्या हवामानाचा परिणाम संभवतो आहे. मात्र हे नेमके कश्यामुळे आहे, याची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल व शेतकऱ्यांना उपाययोजनेची योग्य माहिती दिली जाईल.
सुरज जाधव, तालुका कृषी अधिकारी, वसई
माझ्या वाडीतील केळ्याचे घड हिरवेगार तीस किलोचे हे घड आहेत. ही हजारी केळ काळी झाल्यामुळे जास्त भाव मिळत नाही. यावर कोणता उपाय आहे का. केळीचे संपूर्ण झाड आणि त्याची पाने सुद्धा काळी पडली आहेत. कृषी विभागाने आम्हाला मार्गदर्शन करावे.
लुईस डिमेलो, केळी उत्पादक शेतकरी