बदलापूर लैंगिक शोषणप्रकरणी शाळा संचालक, सचिवांचा जामीन फेटाळला

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; समिती अद्याप कागदावरच
बदलापूर
बदलापूर संतप्त नागरिकांची गर्दीfile photo
Published on
Updated on

ठाणे : बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणात शाळेचे संचालक आणि सचिव यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. शाळा संचालक आणि सचिवांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मुख्याध्यापकासह शाळा संचालक यापूर्वीच फरार असल्याचे सीआयडीने घोषित केले आहे. त्यांचा जामीन अर्ज फेटाळून त्यांना दिलासा देण्यात उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

बदलापूर पूर्व येथील शिशू वर्गातील दोन चिमुरड्यांवर अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय शिंदे याला अटक झाली होती. मात्र तपासादरम्यान एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे उघड झाल्यानंतर पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर शाळा व्यवस्थापनावर गुन्हे दाखल झाले. तेव्हापासून संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक फरार आहेत. २० ऑगस्टला बदलापूरमध्ये मोठे आंदोलन झाले होते. यावेळी रेल्वेही रोखण्यात आली होती. ९ तास रेल्वे आंदोलनादरम्यान बंद होती. या गंभीर प्रकरणात न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे. हे फरार आरोपी पोलिसांना का मिळत नाहीत, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. शाळेची सुरक्षेची जबाबदारी ही संस्थेची आहे. अशी भूमिका शासनाने आणि न्यायालयाने घेतली आहे.

बदलापूर येथील दोन अल्पवयीन शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर शाळकरी मुलांच्या सुरक्षेच्या उपाययोजना सुचवण्यासाठी तज्ज्ञांची समिती तातडीने स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, अद्यापपर्यंत ही समिती कागदवरच असल्याचे उघड झाल्यानंतर शालेय मुलांच्या सुरक्षेबाबत सरकार खरेच गंभीर आहे का? असा संतप्त प्रश्न उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला केला आहे

सरकारची प्रत्यक्षातील कृती विसंगत - न्यायालयाने ओढले ताशेरे

सरकारने याबाबत न्यायालयाला दिलेल्या आश्वासनाचे पालन केलेले नाही, अशा शब्दात न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने फटकारले. सरकारची ही कृती त्याच्याच प्रामाणिक हेतूवर प्रश्न निर्माण करणारी असून सरकारने न्यायालयाला दिलेले आश्वासन आणि सरकारची प्रत्यक्षातील कृती विसंगत असल्याचे ताशेरेही न्यायालयाने ओढले. त्यानंतर, या प्रकरणी राज्याच्या महाधिवक्त्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला दिले.

बदलापूर आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबत अजित पवार सकारात्मक

बदलापूर आंदोलनात सहभागी झालेल्यांवर गुन्हे मागे घेणे संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकारात्मक असून लवकरच याबाबत राज्य सरकार आंदोलकांच्या बाजूने निर्णय घेईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांनी व्यक्त केला आहे.

बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराविरोधात २० ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनामध्ये शहरातील सर्वसामान्य नागरिक, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. हे आंदोलन स्वयंस्फूर्तीने होते. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या राजकारणाचा सहभाग नव्हता. अशा परिस्थितीमध्ये रेल्वे पोलीस, राज्य पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर अन्यायकारक पद्धतीने गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड केली. याबाबत आंदोलकांनी आशिष दामले यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गुन्हे मागे घेण्याबाबत विनंती करण्याची मागणी केली होती. त्यांना दिलेल्या शब्दानुसार अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेऊन आशिष दामले यांनी निवेदन दिले.

या भेटीत दामले यांनी आंदोलनामध्ये सहभागी झालेले अनेक आंदोलनकर्ते हे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच तरुण वर्ग आहेत. अशा लोकांना त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे भविष्यामध्ये अनेक कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याबाबत अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. देताना आंदोलकांना दर आठवडा हजेरी लावण्यास सांगितले आहे. या आंदोलकांना या सर्व बाबींचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे तातडीने याबाबत सकारात्मक विचार करून मार्ग काढावा, अशी विनंती उपमुख्यमंत्र्यांकडे केल्याचे आशिष दामले यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news