डोंबिवलीत राहणारा एक प्रवासी गुरूवारी (दि.15) मुंबईहून-डोंबिवलीच्या दिशेने प्रवास करत असताना बॅग लोकलमध्ये विसरला होता. यानंतर घरी गेल्यावर ही बाब त्याच्या लक्षात आली. ही बॅग डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना ठाकुर्ली रेल्वे स्थानकात लोकलमध्ये गस्त घालताना आढळली. पोलिसांनी या प्रवाशाचा शोध घेऊन त्याची रोख रक्कम असलेली बॅग त्याला परत केली. या घटनेमुळे लोहमार्ग पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जयराम संजीव शेट्टी (वय.42) असे लोकलमध्ये बॅग विसरलेल्या प्रवाशाचे नाव आहे. जयराम शेट्टी हे गुरुवारी (दि.15) आपल्या काही कामानिमित्त डोंबिवलीहून विक्रोळी येथे गेले होते. काम उरकून ते संध्याकाळी डोंबिवलीतील घरी येण्यास निघाले. विक्रोळी रेल्वे स्थानकात त्यांनी कल्याणला जाणारी लोकल पकडली. या लोकलने प्रवास करत असताना त्यांनी आपल्या जवळील 1 लाख 62 हजार रूपयांची बॅग लोकलमधील रॅकवर ठेवली.
डोंबिवली स्थानक आल्यानंतर घाईगडबडीत ते लोकलमधील रॅकवर ठेवलेली बॅग घेण्यास विसरले. 15 ऑगस्ट निमित्त लोहमार्ग पोलिस ठाकुर्ली रेल्वे स्थानकात गुरूवारी संध्याकाळी गस्त घालत होते. रेल्वे स्थानकात लोकल आल्यावर रावसाहेब चौधरी, रोहिणी बांबले, अभिमन्यू बोईनवाड, प्रगती जाधव या कर्मचाऱ्यांनी लोकल डब्यात काही संशयास्पद वस्तू नाही ना याची खात्री करण्यासाठी तपासणी सुरू केली. पोलिसांना एका रॅकवर एक काळी बॅग असल्याचे आढळले. तेथे कोणीही प्रवासी नसल्याने पोलिसांना संशय आला. बॅगचे फोटो व्हिडियो काढून तपासणी केली असता त्यात रोकड आढळून आली. सदर बॅगमध्ये असलेल्या कागदपत्रांवरून जयराम शेट्टी यांची असल्याचे समजल्यावर पोलिसांनी शेट्टी यांना संपर्क केला. डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात बोलावून घेऊन सदर बॅग वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांच्या उपस्थितीत त्यांना परत करण्यात आली. बॅग जशीच्या तशी परत मिळाल्यामुळे जयराम शेट्टी यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले.