बदलापूर, पुढारी वृत्तसेवा : बदलापूर शहरातील शाळेत झालेल्या दोन चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणानंतर शहरातील विविध राजकीय पक्षांनी आपल्या दहीहंड्या रद्द करण्याचा निर्णय यापूर्वी जाहीर केला होता. आता त्या पुढे जाऊन बदलापूर साऊंड असोसिएशनने बदलापूर शहरातील कार्यक्रमांच्या सुपार्या आणि बिदाग्या स्वतःहून रद्द करून कोणत्याही दहीहंडी उत्सवात साऊंड न वाजवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तशा आशयाचे फलक स्टेशन परिसरात लावण्यात आले आहेत.
अत्याचाराच्या घटनेनंतर कुटुंबीयांवर आणि एकूणच शहराच्या समाज मनावर झालेल्या आघातात कोणताही उत्सव साजरा करणे हे शहराच्या संस्कृतीक परंपरेला शोभेचे नाही. म्हणून यंदा दहीहंडी निमित्ताने डीजे आणि साऊंड न वाजवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे साऊंड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई, ठाण्या नंतर बदलापूर शहरातही दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. लाखो रुपयांच्या बक्षीस यांची लय लुट या माध्यमातून करण्यात येते. तसेच डीजे आणि साऊंड सिस्टिमच्या तालावर गोविंदा मोठ्या प्रमाणात थिरकत असतात. मात्र बदलापूर येथे घडलेल्या या विपरीत घटनेनंतर उत्सव साजरा न करण्याचा निर्णय साउंड असोसिएशन ने घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे शहरात कौतुक होत आहे.