Thane crime : रिक्षाचालकाने उचलला प्रवाशी तरुणीवर हात
ठाणे : ठाण्यात रिक्षा चालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच एका रिक्षा चालकाने चक्क प्रवाशी तरुणीवर हात उचलल्याचा संतप्त प्रकार रविवारी सायंकाळी ठाणे स्थानक परिसरात घडला. तरुणीने या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर वाहतूक विभागाने सदर रिक्षा चालकावर ऑनलाइन दंडात्मक कारवाई केली आहे.
ठाण्यात अनेक वेळा रिक्षा चालकांची मुजोरी समोर आली आहे. काही वेळा तर महिला व तरुणींना आपल्या सुरक्षेसाठी चालत्या रिक्षातून उडी घ्यावी लागली असल्याच्या घटना घडल्या आहेत. इतकेच नव्हे तर मुजोर रिक्षा चालकाने काही दिवसांपूर्वी थेट वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांच्या अंगावर रिक्षा घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता एका रिक्षा चालकाने चक्क प्रवाशी तरुणीवर हात उचलल्याची घटना रविवारी ठाण्यात समोर आली आहे.
भाडे नकारण्यावरून झालेल्या वादानंतर रिक्षा चालकाने मागे बसलेल्या तरुणीस हाताच्या चापटीने मारहाण केली. तरुणीने या प्रसंगाचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर सर्वत्र टीकेची झोड उठली. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी सदर रिक्षा चालकावर ऑनलाइन दंडात्मक कारवाई केली आहे.
50 रुपयांच्या हप्त्यात फितूरी
ठाणे स्थानकासमोरील गावदेवी मंदिर, रेल्वे स्थानक, तलावपाळी आदी भागात सायंकाळच्या वेळी रिक्षाने प्रवास करणार्या चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यावेळी रिक्षा चालक प्रवाशांची मोठी पिळवणूक करतात. जवळचे भाडे नाकारणे, मीटर पेक्षा जास्त भाडे आकारणे, प्रवाशांशी अरेरावी करणे आदी प्रकार या ठिकाणी सर्रास घडतात. अशावेळी येथे ड्युटीवर असलेले पोलीस त्यांच्या खाजगी हस्तकामार्फत प्रत्येक रिक्षा चालकांकडून 50 रुपये दरदिवसाचा हप्ता घेवून त्यांना पाहिजे ती मनमानी करण्याची परवानगी देतात.

