

डोंबिवली : तायक्वांदोच्या क्षेत्रात महाराष्ट्राने एक अभूतपूर्व इतिहास रचला आहे. राज्यातील ६ खेळाडूंची आशियाई युवा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धा २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान बहरीन येथे संपन्न होणार आहेत. महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण मानला जातो. कारण राज्यातील प्रथमच अशी लक्षणीय कामगिरी तायक्वांदोच्या ६ खेळाडूंनी नोंदविली आहे.
राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत कठोर आणि स्पर्धात्मक निवड प्रक्रियेनंतर या युवा खेळाडूंनी भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले आहे. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये प्रिशा शेट्टी (सातारा), धनश्री पवार (पुणे), किसारा थानोजी साई रेड्डी (अहिल्यानगर), अक्षरा शानबाग (मुंबई), आर्यन जोशी (पुणे) आणि समर्थ गायकवाड (मुंबई उपनगर) यांचा समावेश आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून हे युवा खेळाडू उत्तरप्रदेश राज्याच्या लखनऊ येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. या सर्व खेळाडूंचा प्रवास, निवास, भोजन आणि प्रशिक्षणाचा सर्व खर्च भारत सरकारच्या युवा क्रीडा मंत्रालयाकडून केला जात आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाने नवी दिल्ली येथे निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या सोहळ्यात महाराष्ट्रातील खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचे विशेष कौतुक करण्यात आले. महाराष्ट्रातील दोन प्रशिक्षकांचीही आशियाई युवा क्रीडा स्पर्धांसाठी निवड झाली आहे. प्रणव निवांगुणे (पुणे) आणि राजन सिंग (मुंबई उपनगर) हे दोघे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
या यशात इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप ओंबासे यांचीही मोलाची भूमिका राहिली आहे. तसेच सरचिटणीस अमजदखान (गफार) पठाण आणि कोषाध्यक्ष डॉ. प्रसाद कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य तुषार आवटे, सुरेश चौधरी, घनश्याम सानप, प्रमोद दौंडे, पद्माकर कांबळे आणि नारायण वाघाडे यांच्या पाठिंब्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात व्यावसायिकता आणि प्रेरणा टिकवून ठेवण्यास मदत झाली आहे.