

डॉ. महेश केळुसकर
साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या 127 व्या जयंतीला 13 ऑगस्ट 2025 रोजी ज्येष्ठ भाष्यकवी रामदास फुटाणे यांच्या हस्ते जेव्हा सुविख्यात रंगकर्मी अशोक हांडे यांना 2025 चा आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान करण्यात आला, तेव्हा हाऊसफुल यशवंत नाट्यमंदिरमध्ये बराच वेळ टाळ्यांचा गजर होत राहिला. अशोकरावांचं कौतुक डोळा भरून बघणार्यांमध्ये त्यांचे कुटुंबीय होतेच; पण जिथे त्यांचं बालपण आणि तरुणपण गेलं त्या रंगारी बदक चाळीतली त्यांची जुनी मित्रमंडळीही होती. सत्काराला उत्तर देताना हांडे यांनी आपल्या जुन्या चाळकर्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांचं उत्तराचं भाषण म्हणजे उत्स्फूर्त नाट्यमय सादरीकरणच होतं. रंगारी बदक चाळीनं आपल्यावर केलेल्या सांस्कृतिक संस्कारांच्या आठवणी सांगताना अशोक हांडे भावनाशील झाले.
आचार्य अत्रे ऊर्फ कवी केशवकुमार यांच्या ‘झेंडूची फुले’ या विडंबन काव्यसंग्रहाचं हे शताब्दी वर्ष आहे. ‘डिंपल पब्लिकेशन’साठी शताब्दी आवृत्तीचं संपादन मी (डॉ. महेश केळुसकर) केलेलं आहे. या आवृत्तीचं प्रकाशनही फुटाणे यांच्या हस्ते याप्रसंगी झालं. कार्यक्रमाध्यक्ष फुटाणे आणि मुख्य वक्ते ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे या दोघांनीही आपापल्या भाषणांमध्ये अशोक हांडे यांच्या सांस्कृतिक कार्य कर्तृत्वाचा विशेष गौरव केला.
आचार्य अत्रे यांचे नातू अॅडव्होकेट राजेंद्र पै आणि कुटुंबीय यांच्या ‘आत्रेय’ या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. मध्यंतरानंतर झालेल्या ‘झेंडूची फुले’ या हास्य काव्य संगीत मैफलीलाही उपस्थितांची खूप चांगली दाद मिळाली. यामध्ये रामदास फुटाणे, महेश केळुसकर, कौशल इनामदार, निनाद आडगावकर, मानसी जोशी पानसे, शिवानी गायतोंडे यांचा सहभाग होता. अत्रे पुरस्काराचे मानकरी अशोक हांडे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उंब्रज या गावी पाच जुलै 1957 रोजी झाला.
बैलाला बांधा गाठ्या
गाडीला बांधा ताठ्या
सईबाई देवाला चला
आईने गायलेल्या अशा जात्यावरच्या ओव्या लहानपणीच कानावर पडल्यामुळे अशोक हांडेंचा स्वर आणि लय पक्की झाली. त्यांच्या आईला रेडिओ ऐकण्याची आणि सिनेमा बघण्याची खूप आवड होती. वडील शंकरराव हांडे तब्येतीने दणकट होते. उंब्रजहून मुंबईला ते पहिल्यांदा आले आणि गोदीमध्ये काम करू लागले. मग डबेवाल्या गाववाल्यांच्या ग्रुपमध्ये सामील झाले. त्यानंतर क्रॉफर्ड मार्केटमध्ये आंब्यांच्या पाट्या आणि खोके उचलायला त्यांनी सुरुवात केली. काही वर्षे हे काम केल्यानंतर आंबे विक्रीचा स्वतंत्र व्यवसाय त्यांनी सुरू केला. पुढे अशोक हांडेनीही मोठे झाल्यानंतर आंब्याचे व्यापारी म्हणूनही नाव कमावलं.
रूम नंबर 41, चाळ नं.6, रंगारी बदक चाळ, डॉ. आंबेडकर रोड, घोडपदेव, भायखळा या पत्त्याचा आपल्याला आजही अभिमान वाटतो, असं अशोकराव सांगतात. या चाळीच्या व्हायब्रेशनमधून माझं आयुष्य घडलं. माझ्यावर सांस्कृतिक संस्कार झाले, असं सांगत असताना त्यांच्या चेहर्यावर अभिमान आणि आनंद असतो. रंगारी सहा इमारती आणि बदक दहा इमारती अशा ह्या दोन चाळी होत्या. सुमारे दहा हजार वस्तीचं ते छोटंसं गावच होतं. कोल्हापूर, नाशिक, बीड, लातूर, कोकण अशा सर्व भागांमधून आलेले चाकरमानी या दोन चाळींमधून राहायचे. अत्रे पुरस्कार स्वीकारल्यानंतर उत्तरादाखल केलेल्या भाषणात रंगारी बदक चाळीचे आपल्यावर कसे संस्कार झाले ते हांडे यांनी सांगितलं आणि बोलता बोलता मालवणी आणि घाटी दोन बायका त्या काळात नळावरचं भांडण कशा करायच्या त्याचं अतिशय हुबेहूब सादरीकरण करूनही दाखवलं.
रंगारी बदक चाळीमध्ये एक चणेवाले मामा होते. ते दर शुक्रवारी दोन गोणी चणे आणि एक गोणी शेंगदाणे आणून लहान मुलांना खाऊ द्यायचे. शाळेतल्या मुलांना शांताराम मास्तर लेझीम शिकवायचे. कोणी लेझीम खेळताना चुकला तर लेझीम फेकूनही मारायचे. पण, आपल्या मुलांवर खरोखर प्रेम करणारे आणि त्यांना जगण्यातली शिस्त शिकवणारे हे शांताराम मास्तर कडक असले तरी चाळीतल्या सगळ्या पालकांचा त्यांना पाठिंबा होता.
बाबुराव रसाळ हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष होते आणि रंगारी बदक चाळीचा गणेशोत्सव लोकप्रिय करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. यावर्षी रंगारी बदक चाळीचा गणेशोत्सव 86 वर्षे पूर्ण करील. शांताराम मयेकर वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करून शाळेतल्या मुलांना त्यात भाग घ्यायला लावायचे. या स्पर्धांमधूनच आपण ईर्षा आणि जिद्द शिकलो. जीवनाच्या स्पर्धांमधून आपण अत्युत्तम असलं पाहिजे हा संस्कार या स्पर्धांनी दिला असं हांडे सांगतात.
सुटलाय वादळी वारा
व्हल्लव जोमाने जरा
चल गाठू किनारा... गाठू किनारा...
गाठू किनारा गंऽ
अशा टिपेच्या आवाजात गात रंगारी बदक चाळीमध्ये शाहीर अमर शेख आपला जलसा करायचे. त्यांच्या आवाजाचा आणि शाहिरीचा संस्कार चाळीतल्या अशोक हांडेंसारख्या तरुणांवर आपोआप होत गेला. भांडवलशाहीचा वारा सुटलाय. त्यातून साम्यवादाची नाव मार्ग काढेल आणि किनारा गाठेल, हा आशावादी मतितार्थ पुढे प्रौढ झाल्यावर कळला. पण, शाहिरी लय तरुण अशोक हांडेंवर कायमचा परिणाम करून गेली. बाळकराम वरळीकरांची कोळीगीतं आणि नाचही चाळीत व्हायचे.
निजामपूरकर बुवांचं कीर्तन ऐकून वारकरी परंपरेचा इतिहास अभ्यासावा असं मनात धरून रसाळ शैलीत आख्यान कसं लावावं याचंही शिक्षण झालं. यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब पुरंदरे अशा मोठ्या वक्त्यांची भाषणं लहानपणीच ऐकल्यामुळे वक्तृत्व कला आकारास येत गेली.
कुठलीही कला अंगात उपजत असावी लागते. तशी ती अशोक हांडेंकडे होती. ते पाचवीत असताना त्यांच्या चुलत भावाने काढलेल्या ‘मिलन कला झंकार’ या वाद्यवृंद समूहात कुठलंही गाणं अभिनयासहित म्हणून वंडर बॉय अशोक उपस्थित प्रेक्षकांना चकित करत असे. पुढे रूपारेल कॉलेजला इंटरला असताना 1977 साली ‘मंगल गाणी... दंगल गाणी ’ या कार्यक्रमाचं लेखन अशोक हांडे यांनी केलं तेव्हाही त्यांचे मित्र आणि प्राध्यापक चकित झाले. 7 ऑगस्ट 1987 रोजी ‘चौरंग’ या संस्थेची स्थापना त्यांनी केली. भारतीय संस्कृती आणि परंपरेला लोककलांच्या आणि संगीतमय कार्यक्रमांच्या माध्यमातून उजाळा देण्यासाठी हांडे आणि त्यांचे 150 कलाकार अहोरात्र मेहनत घेऊ लागले.
यश अपयशाचे चढ- उतार होत राहिले. पण ‘आवाज की दुनिया’, ‘माणिक मोती’ आणि ‘मराठी बाणा’ यासारख्या कार्यक्रमांना अफाट लोकप्रियता मिळाली. 8 मार्च 2020 रोजी ‘मराठी बाणा’चा 2000 वा प्रयोग करून हांडे यांनी एक वेगळाच विक्रम प्रस्थापित केला. कला आणि व्यवहार यांची सांगड घालून मराठी संस्कृतीचा झेंडा अटकेपार नेणार्या अशोक हांडेंचे पाय मात्र अजूनही जमिनीवर आहेत. 13 ऑगस्टला आचार्य अत्रे पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात आपल्या यशाचं श्रेय आई-वडिलांना, गुरुजनांना व रंगारी बदक चाळीच्या संस्कारांना त्यांनी दिलं तेव्हा याचा प्रत्यय आला.